‘शेकापच्या जडणघडणीतील दुवा निखळला’- आ.जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस

ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील हे शेतकरी कामगार पक्षाच्या जडणघडणीतील एक महत्वाचा दुवा होते. तो दुवा निखळून पडला आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार आदी घटकांचा प्रश्‍न त्यांनी चळवळीच्या माध्यमातून सोडविण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. सीमा लढ्यातील त्यांचे योगदान मोठे होते. याशिवाय सन 1972 मध्ये दुष्काळात केलेल्या आंदोलनातही ते नेहमीच अग्रेसर आणि आक्रमक राहिले. इस्लामपूर येथे जे आंदोलन झाले, त्यात झालेल्या गोळीबारात एनडींचा पुतण्या शहीद झाला. याशिवाय वैराग येथेही जे आंदोलन करण्यात आले, त्यातही एनडी यांनीच नेतृत्व केले होते.

रायगडात ज्या ज्यावेळी शेकापतर्फे आंदोलने करण्यात आली, त्यावेळीही एनडी यांनी पुढाकार घेतला होता. उरण तालुक्यातील सिडको विरोधात ज्येष्ठ नेते डी.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनातही एनडी हिरीरीने सहभागी झाले होते. रायगडातील सेझ प्रकल्पाविरोधात जे आंदोलन करण्यात आले, त्यातही एनडी यांनीच नेतृत्व केले. त्या आंदोलनामुळे सेझ प्रकल्प हद्दपार करावा लागला. हे देशातील पहिलेच उदाहरण होय. माझ्यासारखे कार्यकर्ते हे एनडींच्या प्रभावाने घडलेले आहेत. विधीमंडळातही ते नेहमीच आक्रमक राहिले. विधानसभेत एकच टर्म त्यांनी नेतृत्व केले; पण विधानपरिषदेत मात्र ते प्रदीर्घ काळ कार्यरत होते. या काळात त्यांनी आक्रमकपणे भाषणे करुन सरकारला सर्वसामान्यांना जाचक असे कायदे रद्द करण्यास, अथवा बदलण्यास भाग पाडले.

विधानपरिषदेतही ते दोन वेळा विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. सभागृहातील त्यांची कामगिरी खरोखरच नाविण्यपूर्ण अशीच होती. कोल्हापूरशी निगडीत पाणी, शेती पंप, वीज बिलाबाबत ते नेहमीच आक्रमक असत. विशेष करुन कोल्हापूरचा टोल नाका रद्द करावा, यासाठी जे आंदोलन करण्यात आले ते सुद्धा एनडींच्या नेतृत्वाखालीच करण्यात आले. त्यांच्या निधनाने कष्टकरी वर्ग पोरका झालेला आहे.

माझ्या राजकीय, सामाजिक जडणघडणीतही एनडींचा मोठा वाटा आहे. मला नाशिकच्या अधिवेशनात पक्षाचे सरचिटणीपद त्यांच्याच आग्रहास्तव स्वीकारावे लागले. शिवाय 2001 मध्ये ज्यावेळी प्रथम विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आलो, त्यावेळी एनडी यांनीच ही निवडणूक जयंता तु लढवावी, असा आग्रह धरला. मी त्याला नकार दिला होता. कारण त्यावेळी माझी बहिण मीनाक्षी पाटील या आमदार म्हणून कार्यरत होत्या. एकाच घरात दोन आमदार असणे अयोग्य वाटते, अशी माझी भूमिका मांडून मी अलिबागला आलो. पण ज्येष्ठ नेते विठ्ठलराव हंडे हे मला अलिबागला न्यायला आले. पक्षाच्या या ज्येष्ठ नेत्यांच्या सुचनेवरुन उमेदवारी अर्ज भरुन विजयीही झालो.

शेकापच्या माध्यमातून दरवर्षी अभ्यासवर्ग भरविले जात असत. त्या अभ्यासवर्गातूनच माझी जडणघडण होत राहिली. या अभ्यासवर्गात एनडींसह दाजिबा देसाई, उद्धवराव पाटील, विठ्ठलराव हंडे आदींचे मार्गदर्शन होत असे. त्यात एनडी यांचे किमान तीन, चार तास चालणारे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन निश्‍चितच उपयोगी पडत राहिले. आज त्यांची या निमित्ताने निश्‍चित आठवण होते. गेल्याच वर्षी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. पाठोपाठ एनडी यांनीही निरोप घेतला. या दोन नेत्यांच्या जाण्याने शेकापचे प्रचंड नुकसान झाले आहे. ती पोकळी कदापी भरुन न निघणारी आहे. एनडी यांना शेकापतर्फे भावपूर्ण आदराजंली.

Exit mobile version