महाराष्ट्राची सलामी गुजरातशी
| नगर | वृत्तसंस्था |
प्रो-कबड्डी विजेतेपदाने जबरदस्त लयीत असलेल्या अस्लम इनामदारच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्यासाठी महाराष्ट्र संघ सज्ज झाला आहे. महाराष्ट्राचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला असून, सलामीला महाराष्ट्राची लढत गुजरात संघाशी होणार आहे. नगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुलात ही स्पर्धा रंगणार असून, सहभागी 30 संघांना 8 गटांत विभागण्यात आले आहे. महाराष्ट्राचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. गटात दिल्ली आणि गुजरात हे अन्य दोन संघ आहे.
नेहमीप्रमाणे रेल्वे, सेनादल, हरियाणा असे तगडे संघ असले, तरी या वेळी महाराष्ट्राच्या कामगिरीकडे विशेष लक्ष लागून आहे. गेल्या वर्षी हुकलेले विजेतेपद घरच्या मैदानावर खेचून आणण्यासाठी महाराष्ट्र संघातील प्रत्येक खेळाडू सज्ज झाला आहे. कागदावर ताकदवान दिसणारा महाराष्ट्राचा संघ मैदानावरही आपली ताकद दाखवून देईल, असे प्रशिक्षक शांताराम जाधव यांनी सांगितले. चढाई आणि बचावफळी अशा दोन्ही आघाडयंवर संघाची ताकद भक्कम आहे. प्रो-कबड्डी विजेतेपद मिळविणार्या पुणेरी पलटण संघातील चार खेळाडू या संघातून खेळत असल्यामुळे खेळाच्या प्रवाहात असल्याचा फायदा आपल्याला मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा संघ युवा खेळाडूंचा आणि महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल असल्याची खात्री देणारा आहे. संघातील सर्वच खेळाडू युवा असून, साधारण 23 ते 24 असेसंघाचे सरासरी वय आहे. प्रत्येक खेळाडू तंदुरुस्त असून, त्यांना विजेतेपदाने झपाटले आहे. आत्मविश्वास दांडगा असल्यामुळे विजेतेपदाची आशा आहे, असेही शांताराम जाधव म्हणाले.
स्पर्धेची गटवारी 'अ' गट : रेल्वे, मध्य प्रदेश, बीएसएनएल, 'ब' गट : महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, 'क' गट : गोवा, बिहार, मणिपूर, बंगाल, 'ड' गट : हरियाणा, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, 'ई' गट : तमिळनाडू, राजस्थान, झारखंड, पुड्डुचेरी, 'फ' गट : चंडीगड, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, 'ग' गट : उत्तर प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर, विदर्भ, 'ह' गट : सेनादल, पंजाब, आंध्र, ओडिशा.