| औरंगाबाद | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालं आहे. औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी रविवारी (दि.1) वयाच्या 102 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतली त्यांची भाषणं खूप गाजली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील आदी शोक प्रकट केला आहे. जुन्या पिढीतील बुजुर्ग, अभ्यासू,ब्जनसामान्यांविषयी तळमळ असणारा नेता महाराष्ट्राने गमावला अशी शोकमग्न प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
पाचवेळा आमदार राहिले
धोंडगे हे पाचवेळा आमदार झाले होते तर एकदा खासदार झाले होते. मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत असल्याने त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ असंही म्हटलं जात होतं. कंधार तालु्क्यातल्या गऊळ या गावात त्यांचा जन्म झाला होता. समस्या सहन करणार्या, पिचलेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी केशवराव धोंडगे आग्रही होते. त्यांनी अनेक आंदोलनांमध्येही सहभाग घेतला होता. त्यांनी या समाजातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा प्रश्न उपस्थित केले.
खासदारपदी एकदा आणि पाचवेळा आमदारपद भुषवलेल्या केशवराव धोंडगे यांनी आपल्या कामाचा ठसा कायमच आपल्या आंदोलनातून आणि आपल्या भाषणांमधून तसं आपल्या कार्यातून उमटवला. निर्भिड आणि स्वाभिमानी बाणा हे त्यांचे स्वभावविशेष होते. विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी ते सभागृहात उपस्थित राहात असत.
सरकारतर्फे गौरव
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात केशवराव धोंडगे यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या शताब्दीच्या वेळीच सरकार त्यांचा सत्कार करणार होतं. पण करोनामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
केशवराव धोंडगे यांनी शरद पवारांना दिली होती खास उपमा.
केशवराव धोंडगे यांनी शरद पवार यांना बिनचिपळीचा नारद अशी उपमा दिली होती. एवढंच नाही तर वयाची शंभरी पार केल्यावरही ते म्हणायचे की मी शंभरीत असलो तरीही मी शेवटपर्यंत काम करत राहिन. तत्त्वाचे राजकारण करणारे मोजकेच आहेत पण रंग बदलणारे खूप. सरड्यासारखे रंग बदलणारे खूप असतात असं मत केशवराव धोंडगे यांनी त्यांच्या शंभरीच्या वेळी व्यक्त केलं होतं.
औरंगाबादला आकाशवाणी केंद्र व्हावे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, परभणीत कृषी विद्यापीठ व्हावे अशा अनेक मागण्या केशवराव धोंडगे यांनी लावून धरल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी विरोधकांना घाम फोडला होता. पण त्यांचे बोलणे मोठे विनोद निर्माण करणारे होते. महाराष्ट्राच्या भेटीला आलेल्या इंग्लंडच्या राणीला वस्त्रालंकार आणि नथ भेट देण्यात आली होती. त्यावरून धोंडगे यांनी केलेल्या टिप्पणीमुळे सभागृहात हशा पिकला होता.
वादळ शमलं- आ. जयंत पाटील
शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्या निधनाने राजकारणातील एक वादळ शमल आहे. शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेचा आवाज अशी त्यांची ओळख होती. विधानसभा वा संसद या दोन्ही ठिकाणी त्यांनी सर्व सामान्यांच्या प्रश्नांना आपल्या धारदार शैलीने आवाज फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. आमच्या सारख्या पिढीला त्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले, अशी प्रतिक्रिया आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.