वरिष्ठ महिला गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धा

कर्नाटकचा विजय; हिमाचल-राजस्थान लढत बरोबरीत

| पुणे | वृत्तसंस्था |

मणिपूर संघाने उत्तराखंड संघावर 11-2 अशा मोठ्या गोलफरकाने विजय प्राप्त करीत चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अन्य लढतींत कर्नाटकने विजय मिळविला, तर हिमाचल आणि राजस्थान संघ यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जोरदार कामगिरी करणार्‍या मणिपूर संघाच्या खेळाडूंनी उत्तराखंड संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजविले. त्यांचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला.

यावेळी मणिपूरच्या वर्तिका रावतने पाचव्याच मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले त्यापाठोपाठ क्षेत्रिमायुम सोनिया देवीने 7 व्या मिनिटाला दुसरा गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ब्रम्हचारीमायुम सरिता देवीचेने (8 व 24 वे मिनिट), प्रभलीन कौरचेने (14 व 45 वे मिनिट) आणि चिंगशुभम संगई इबेनहाईचेने (53 व 60 वे मिनिट) प्रत्येकी दोन गोल केले तर सनासम रंजिता (44 वे मिनिट), लिली चानू मतेंगबम (57 वे मिनिट), चानू लचेंबी खुंद्रकपमने (59 वे मिनिट) प्रत्येकी एक गोल केला. उत्तराखंड संघाकडून कोमल धामी (36 वे मिनिट) व मोनिका चंदने (41 वे मिनिट) प्रत्येकी एक गोल केला.

दुसर्‍या सामन्यात कर्नाटकने दादरा नगर, हवेली, दीव, दमण या संघावर 13-0 अशा फरकाने मोठा विजय मिळविला. त्यात प्रमुख वाटा कृत्तिकाने (15, 26, 56 व 57 वे मिनिट) केलेल्या चार गोलचा होता. तिला एम.जी. याशिकाने (20, 38 व 58 वे मिनिट) तीन, जे. चंदनाने दोन (33 व 37 वे मिनिट), तर अदिरा एस (43 वे मिनिट), प्रशु संघ परिहार (48 वे मिनिट), अंजली एच. आर. (55 वे मिनिट), गेडेला गायत्रीने (60 वे मिनिट) प्रत्येकी एक गोल करून सुरेख साथ दिली.

‘एच’ गटातील हिमाचल आणि राजस्थान संघ यांच्यातील लढत 4-4 अशी बरोबरीत सुटली. यावेळी हिमाचलकडून धापा देवीने (4 व 49 वे मिनिट) दोन तर रितू (17 वे मिनिट) आणि भूमिका चौहानने (53 वे मिनिट) प्रत्येकी एक गोल केला. राजस्थानकडून रीना सैनी (41 व 48 वे मिनिट) आणि बलवंत रीना कंवरने (25 व 40 वे मिनिट) प्रत्येकी दोन गोल करून सामना बरोबरीत रोखण्यात यश मिळविले.

Exit mobile version