| धाटाव | प्रतिनिधी |
रोह्यात पोक्सो अंतर्गत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर 25 वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर या तरुणाने तिला अश्लील मॅसेज पाठविले. चॅटिंग केलेले अश्लील मॅसेज मुलीच्या एक्स बॉय फ्रेंडच्या हाती लागल्यानंतर त्याने पीडित अल्पवयीन मुलीला सदर अश्लील मॅसेज व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना रोहा तालुक्यातील उसर गावात घडली असून, रोहा पोलिसांनी बुधवारी रात्री दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उसर गावातील 14 वर्षीय मुलीने इन्स्ट्राग्रामवर अकाऊंट सुरु केले होते. आरोपी ओमकार संजय पिंपळे (25), रा. तळवली, ता. रोहा याने सदर तरुणीला इन्स्टाग्रामवर अश्लील मॅसेज केले होते. हे मॅसेज त्या पीडित तरुणीचा एक्स बॉय फ्रेंड असलेला दुसरा आरोपी देवेश रवींद्र सावंत (25), रा. नागोठणे, ता. रोहा याच्या हाती लागले. आरोपी देवेश सावंत याचे आणि पीडित मुलीचे प्रेमसंबध होते. पण, गावात या विषयाची माहिती समजल्यानंतर प्रेमसंबंध तोडले होते. असे असताना ओमकार पिंपळे याने पाठवलेले अश्लील मॅसेज मी सर्वत्र व्हायरल करेन, अशी धमकी देऊन पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करुन उसर गावातील गणेश गावडे यांच्या बंद अवस्थेत असलेल्या घरात नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. सदर घटना कोणाला सांगितलीस तर तुला मारून टाकेन, अशी धमकीदेखील त्या आरोपीने दिली.
उसर गावात सुट्टीनिमित्त आलेल्या पीडित मुलीने घडलेली सर्व घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर घरच्या मंडळींनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत दोन्ही आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचार, विनयभंग आदी गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना बुधवारी रात्री अटक केली आहे. दरम्यान, रोह्यात घडलेल्या खळबळजनक घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असून, संबंधित गुन्ह्याबाबत रोहा पोलीस अधिक तपास करीत आहेत.






