ट्रकमध्ये लागणार सेन्सर; वाहन चालवताना उडणार झोप

रस्ते अपघात टाळण्यासाठी गडकरींची अभिनव योजना!
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात हा प्रशासनासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्यामुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक झालं आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले असून त्यानुसार ट्रक चालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक चालवताना डुलकी लागल्यामुळे होणार्‍या अपघातांना यामुळे आवर घालण्यास मोठी मदत होणार आहे. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी हे आदेश दिले आहेत. तसेच, त्यासंदर्भात सर्व राज्य सरकारे आणि जिल्हाधिकार्‍यांना देखील निर्देश दिले जातील, असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.

रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरींनीच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा गटाची स्थापना केली आहे. तसेच, दर दोन महिन्यांनी या गटाची बैठक होते आणि त्यात संभाव्य योजनांवर चर्चा होते. या गटाच्या बैठकीमध्ये नितीन गडकरींनी ट्रकमुळे होणार्‍या अपघातांवर तोडगा काढण्यासाठी अभिनव संकल्पनेवर चर्चा केली असून त्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश देखील दिले आहेत.

ट्रकमध्ये सेन्सर्स बसवणार!
मालवाहू ट्रकचालक लांब पल्ल्याचे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी माल वाहून नेत असतात. त्यामुळे या प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागण्याची देखील शक्यता असते. अशाच काही प्रकरणात मोठे अपघात झाल्याचं देखील दिसून आलं आहे. त्यामुळेच ट्रकचालकांना डुलकी लागू नये, यासाठी देशातील सर्व व्यावसायिक वापराच्या ट्रकमध्ये On-Board Sleep Detection Sensors अर्थात चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारांचं प्रमाण कमी होऊ शकेल.

Exit mobile version