ग्रामस्थांची रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत-मुरबाड महामार्गावर कळंब ते पोही दरम्यानच्या त्रिकोणी रस्त्यावर गतिरोधकांच्या अभावामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः कर्जतहून सुसाट वेगाने येणार्या वाहनांमुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बोरगाव येथील एका रिक्षाचा अपघातात चक्काचूर झाला होता, तर पोशीर येथील प्रवासी वाहतूक करणार्या एका इको गाडीला टँकरने धडक दिली. तर आज रिक्षा आणि गॅस टाकी वाहतूक करणार्या वाहनाचा अपघात घडला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांकडून या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. महामार्गावरील कळंब ते नेरळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, परंतु गतिरोधक नसल्यामुळे कर्जतहून येणार्या मालवाहू ट्रक आणि इतर वेगवान वाहनांच्या धडकांमुळे अपघात घडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांनी या मुद्द्यावर आवाज उठवला आहे, परंतु अद्याप उपाययोजना झालेल्या नाहीत. एमएसआरडीच्या सिमेंट काँक्रीट महामार्गावरील या त्रासदायक स्थितीमुळे रस्त्यावरील सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर गतिरोधक बसवून उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येने अवजड वाहन येत जात असताना त्यामुळे कर्जतकडून सुसाट वेगाने येणार्या वाहन कळंबनजीक असलेल्या पोंही येथील त्रिकोनावर कळंबकडून येणार्या नेरळकडे वळण घेऊन जाणार्या प्रवासी वाहनांना मोठा धोका संभावत आहे, गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. संबंधित अधिकार्याने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.