| संभाजीनगर | वृत्तसंस्था |
आज गुरुवारी (दि.18) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गाडीतील 2 जण जागीच ठार, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही स्कॉर्पिओ गाडी संभाजीनगरहून नाशिककडे येत होती. त्यामधील सर्व प्रवासी संभाजीनगरच्या करवड गावचे रहिवासी आहेत.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून गाडी उलटली आणि त्यामुळे भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या महितीनुसार, बाजीराव एकनाथ गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. तर निशा रामकिसन गडगूळ (20) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये वाहन चालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ, मिनाबाई रामकिसन गडगूळ जखमी आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.