वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मागणी
| पनवेल | वार्ताहर |
वाहतूक पोलिसांकडून दिवाळीनंतर टोइंग व्हॅन बंद केल्यामुळे नविन पनवेल रेल्वेस्थानक परिसरातील रस्ते बेकायदेशीर वाहनतळ होऊन बसले आहेत. नविन पनवेलमध्ये पार्कींगची मोठी समस्या आहे. नविन पनवेल शहरालगत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभी राहिली आहेत. येथिल चाकरमान्यांना रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे नाइलाजास्तव दुचाकी वाहने घेऊन कामधंद्यानिमित्त मुंबई, नवीमुंबईकडे ये-जा करावे लागते. यामुळे नविन पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सेक्टर 18,17,15,15 ए येथिल फूटपाथवर बेकायदेशीरपणे दुचाकी, रिक्षा चालक तसेच चारचाकी वाहने वाहनचालककडून पार्क केली जात आहे. रेल्वे स्थानक परिसरातील सिडकोचे व रेल्वेचे पे अँण्ड पार्क दुचाकी वाहनाने पूर्ण भरले जात आहे. यामुळे सेक्टर 17, 5 च्या गल्लीत फूटपाथवर, रस्त्यांवर बेकायदेशीर वाहने पार्क केली जात आहे. या परिसरात बहूदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय शाळा याच मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांच्यावतीने बेशीस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण या मार्गावर वाहतूक नियंमाना फाटा देत मनमर्जीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची येथिल सुजान नागरिकांसह वाहनचालकांची मागणी आहे.
टोईंग कारवाईअभावी शहरातील स्टेशन परिसर आणि वर्दळीच्या ठिकाणी वाहने बेशिस्तपणे पार्क करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आधीच अरुंद रस्ते, त्यात दुतर्फा दुचाकींची पार्किंग आणि त्यापुढे फेरीवाले आणि रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या चारचाकींमुळे वाहतूककोंडीची स्फोटक स्थिती आहे. दुसरीकडे पालिकेने शहरात लावलेल्या नो पार्किंग फलकांची दुरवस्था झाली असून हे फलक केवळ शोभेपुरतेच उरले आहेत. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ कोंडीतून मार्ग काढतांना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून यातून वादाचे प्रसंग वाढत आहेत.
शहरे टोईंगमुक्त करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील अन्य शहरांत केली जात आहे. शहरात लोकसंख्येनुसार वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्या तुलनेत स्टेशन परिसरात पालिकेकडून पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्क करत असतात. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या भागात सकाळ, संध्याकाळ कोंडीचे प्रमाण वाढले आहे. स्टेशन परिसर, बाजारपेठांत खरेदी आणि हॉलेटमध्ये येणारे अनेकजण आपली चारचाकी वाहने भर रस्त्यात उभी करून निघून जातात. वाहतूक पोलिसांकडून टोईंग अथवा जॅमरची कारवाई आणि सुविधाच उपलब्ध नसल्याने अशा बेशिस्त वाहन चालकांचे फावत आहे. पालिकेने शहरात पार्किंग सुविधा आणि क्षमता वाढवल्यास रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास मदत होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.





