| अलिबाग | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात सेवा पंधरवड्याची सुरुवात झाली आहे. या अभियानाचा शुभारंभ माणगावातील प्रशासकीय भवनामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध लाभ देत करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, जिल्ह्यात सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पाणंद रस्ते, रेती, घरकुल, सनद वाटप, सेतू सुविधा केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्र यासारखे लोकाभिमुख उपक्रम राबवून विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. हे अभियान तीन टप्यांमध्ये राबविण्यात येणार असून, पहिला टप्पा दि.17 ते 22 सप्टेंबर, दुसरा टप्पा दि.23 ते 27 सप्टेंबर आणि तिसरा टप्पा दि.28 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक टप्प्यातील मोहिम उपस्थितांना समाजावून सांगितली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, माणगाव प्रांताधिकारी संदीपान सानप, रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर, सहाय्यक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, तहसिलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, नायब तहसिलदार विपुल ढुमे आदी प्रशासकीय अधिकारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.







