तहसिल कार्यालयच्यावतीने विविध उपक्रम
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत, 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत सुधागड-पालीच्या तहसिल कार्यालयच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन टप्प्यांत ही अंमलबजावणी होणार आहे.
त्यातील 17 ते 22 सप्टेंबर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांच्या सहभागाने शिवारफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. गावातील पाणंद रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून यादी तयार केली जाणर आहे. ही यादी ग्रामसभेत वाचन करून मंजुरी घेण्यात येणार असून, त्यानंतर रस्त्यांची मोजणीसाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. रस्त्यांचे सिमांकन करून दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच, सर्व रस्त्यांची एकत्रित नोंद गाव नमुना क्रमांक 1(फ) मध्ये समाविष्ट केली जाणार आहे.
23 ते 27 सप्टेंबर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणांचे नियमबद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना अधिकृत हक्क प्राप्त होणार असून, त्यांच्या मालकीच्या दाव्यांना कायदेशीर आधार मिळणार आहे.
त्यांनतर 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्यात आदिवासी बांधवांच्या पाल्यांना जन्म दाखले आदेश वाटप करण्यात येणार आहेत. संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांची थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमांतर्गत आजी-माजी सैनिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण केले जाणार आहे. तसेच, आयुष्यमान भारत कार्ड शिबीर आयोजित करून नागरिकांना आरोग्य सुरक्षा प्रदान केल्या जाणार आहेत.
या उपक्रमांमुळे सुधागड तालुक्यातील ग्रामस्थांना वास्तव सेवा, कायदेशीर हक्क आणि सामाजिक सुरक्षा यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने सर्व नागरिकांना या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
सेवा पंधरवड्याचा उद्देश म्हणजे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सशक्त करणे हा आहे. प्रत्येक उपक्रम हा जनतेच्या हितासाठी असून, सर्व विभागांनी समर्पित भावनेने काम करावे.
उत्तम कुंभार,
तहसीलदार, सुधागड-पाली
