उचित ध्येय आत्ताच निश्‍चित करा – चित्रा पाटील

। पेझारी । वार्ताहर ।
शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला उचित कलाटणी देणारी परीक्षा आहे. या टप्प्यावर अत्यंत विचारपूर्वक उचित ध्येय निश्‍चित करा आणि त्या ध्येयाचा पाठपुरावा करा, असे केल्यास आयुष्यात तुम्हाला यश निश्‍चितच मिळेल, असे प्रतिपादन झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा रा.जि.प. माजी सदस्या डॉ. चित्रा आस्वाद पाटील यांनी पोयनाड शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात केले.
या शाळेचा निकाल 99.44 टक्के एवढा लागून 181 पैकी 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 52 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह, तर 84 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ चित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्रथम- स्वरा म्हात्रे, द्वितीय- पार्थ मानकर, तृतीय- कार्तिकी पाटील(90.40), चतुर्थ रिया थळे, पाचवा- पार्थ पाटील या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे या प्रथम, तृतीय आणि पाचवा क्रमांक मिळविलेले विद्यार्थी हे कुसुंबळे विभागातील आहेत. एवढ्या दूरवरून कोरोना काळात वाहनाची व्यवस्था नसतानाही शाळेत नियमित घेऊन या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे, त्यांचे विशेष कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक केके फडतरे, सत्रप्रमुख एस.के. पाटील, संध्या खरसंबळे, शिक्षक अविनाश पाटील, उदय पाटील, सायली पाटील आदी उपस्थित होते

Exit mobile version