शासनातर्फे सेवादूत प्रणाली उपक्रम
| गुहागर | प्रतिनिधी |
अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला आदी 10 दाखले गुहागर नगरपंचायत, असगोली व पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात घरबसल्या मिळणार आहेत. शासनाचा सेवादूत उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यात सुरू केला आहे. नागरिक व ग्रामस्थांनी सेवादूतच्या लिंकवर जाऊन दाखल्याची मागणी भरल्यावर सेवाकेंद्राचे कर्मचारी थेट संबंधित घरी जाऊन पुढील कार्यवाही करणार आहेत, अशी माहिती तहसीलदार परिक्षित पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र शासनातर्फे सेवादूत प्रणाली उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, शेतकरी, दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र, डोंगरी दाखला, 30 टक्के महिला आरक्षण हे दाखले घरबसल्या मिळणार आहेत. ही योजना वर्धा, पुणे, अहिल्यादेवीनगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत सुरू होत आहे. प्रायोगिक तत्त्वावर सेवादूत प्रणाली तालुक्यात राबविण्याचे ठरविले.
तालुक्यातील नगरपंचायत, पाटपन्हाळे व असगोली या दोन ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सेवादूत प्रणाली वापरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत संशोधन आणि विकास (आर ॲण्ड डी) कार्यक्रमांतर्गत बदल करण्यात येतील. ही प्रणाली सुरळीत सुरू झाली की, जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे.