। उरण । वार्ताहर ।
सध्या ऑनलाईन फसवणूक वाढत असून त्यापासून सावध रहा, असे अनेक मेसेज रोज सोशल मिडीयावर फिरत असतात. मात्र त्यापासून कोणी धडा घेताना दिसत नाही. तुमचे वीज बील थकले आहे. ताबडतोब न भरल्यास तुमचा वीज पुरवठा खंडीत होईल, असा मेसेज पाठवून बीपीसीएलच्या एका कामगाराला तब्बल 7 लाख 64 हजार 669 रूपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. श्यामकुमार रामकृष्ण बेनगिरी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बेनगिरी यांना मंगळवारी (दि.16) एक मेसेज आला. त्यात वीज बील न भरल्यामुळे वीज पुरवठा रात्री बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच याबाबत चौकशी करण्यासाठी एक मोबाईल क्रमांक पाठविण्यात आला. त्या क्रमांकावर बेनगिरी यांनी फोन केला असता त्यांना तुमचे बील थकले असून तुम्हाला एक लिंक पाठवतो त्यावर माहिती भरण्यास सांगितले. लिंकवर माहिती भरल्यानंतर त्यांना प्ले स्टोअरमधून क्यूटी ऍप डाऊनलोड करण्यास सांगून त्यावर 10 रू पाठविण्यास सांगितले. ते पेमेंट पुर्ण झाले नाही म्हणून त्यांनी बेनगिरी यांच्याकडून बीपीसीएल कंपनीचा फोन क्रमांक मागितला. त्यानंतर बेनगिरी यांच्या खात्यातून एकूण 7 लाख 64 हजार 669 रूपये वजा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर बेनगिरी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने उरण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.