म्हसळा पाष्टीतील शेतकऱ्याला आर्थिक फटका
| म्हसळा | प्रतिनिधी |
तालुक्यातील पाष्टी येथील दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी जीवन गोविंद लाड यांच्या पाच गायी आणि दोन बैल जंगलात चरण्यासाठी गेले असता सायंकाळी घराकडे परतत असताना केळीची गोठण येथे वीज वाहक तार तुटून पडल्याने गुरांना विजेचा शॉक लागून ती जागीच गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा घडली असल्याचे सांगण्यात आले.
5 सप्टेंबर रोजी सकाळी गायी व बैल गोठ्यात आले नाहीत म्हणून शेतकरी जीवन लाड शोध घेत असताना त्यांना त्यांची सर्व जनावरे पाष्टी-मोरवणे गावाच्या हद्दीत केळीची गोठण येथे मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती म्हसळा तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, वीज वितरण कंपनी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला आहे. या दुर्घटनेत दुग्ध व्यवसाय करणारे जीवन लाड यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.







