35 कोटींचा बेकायदेशीर स्फोटक माल जप्त
| उरण | वार्ताहर |
देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्या काळा बाजारांना आता महसूल गुप्तचर संचालनालयाने चांगलाच झटका दिला आहे. ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ या गुप्त मोहिमेतून मुंबई विभागीय युनिटने एक धडाकेबाज कारवाई करत न्हावा शेवा बंदर, मुंद्रा बंदर आणि कांडला (सेझ) येथून चक्क 35 कोटींचे चिनी फटाके असलेले सात कंटेनर्स जप्त केले आहेत. या फटाक्यांचे वजन तब्बल 100 मेट्रिक टन असून, हे संपूर्ण स्फोटक साठवण खोट्या घोषणांच्या आड लपवण्यात आले होते.
मिनी डेकोरेटिव्ह प्लांट्स, आर्टिफिशियल फुले आणि प्लास्टिक मॅट्स अशा बिनधोक वस्तू म्हणून जाहीर करून देशात बेकायदेशीरपणे हे फटाके डंप करण्याचा कट आखला गेला होता. मात्र, डीआरआयच्या अत्यंत बारकाईच्या कारवाईने हा स्फोटक कट उधळून लावला. या फटाक्यांत लाल शिसे, लिथियम, तांबे ऑक्साईडसारखी अत्यंत धोकादायक रसायने आढळली असून, कोणताही परवाना न घेता या मालाची आयात करण्यात आली होती. भारताच्या विदेश व्यापार धोरण व 2008 च्या स्फोटक नियमांनुसार, फटाक्यांची आयात ही प्रतिबंधित श्रेणीत मोडते. त्यामुळे स्फोटक सुरक्षा संघटनेकडून परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, या सर्व नियमांना हरताळ फासत, सेझ युनिटच्या माध्यमातून देशांतर्गत वितरणासाठी ही मालवाहतूक सुरू होती. ही केवळ तस्करी नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुळावर उठलेला गंभीर हल्लाच होता. कारण, एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्फोटक माल देशात शिरला असता, तर कुठल्याही क्षणी अपघात, स्फोट किंवा लॉजिस्टिक साखळीतील गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती. बंदराच्या सुरक्षेपासून ते संपूर्ण वाहतूक व्यवस्थेपर्यंत याचा भयंकर फटका बसला असता. या कारवाईमागे असलेल्या सूत्रधाराची ‘डीआरआय’ने ओळख पटवली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित ‘सेझ’ युनिटमधील एक भागीदार असल्याचे उघड झाले असून, त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.







