सात दिवस रेशनिंग बंद

17 लाख लाभार्थी धान्यापासून वंचित
सॉप्टवेअर अपडेटेशनमुळे ई-पॉजवर परिणाम

। अलिबाग । भारत रांजणकर ।
सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेत सुसत्रता येण्यासाठी पुरवठा विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन प्रक्रीयेच्या आरसीएमएस सॉप्टवेअरचे अपडेटेशन सुरु असल्याने सुरु असलेल्या ऑनलाईन गोंंधळात जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख शिधापत्रिका धारक असून 17 लाख 50 हजार लाभार्थी आहेत. सध्या सुरु असलेल्या नव्या सॉप्टवेअरचे अपडेटेशन सुरु असल्याने ई-पॉज मशीनवर धान्याची नोंदच दुकानदारांना करता येत नाही. मागील सात दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये सावळागोंधळ सुरु आहे, यामुळे रायगड जिल्ह्यातील लाखो लाभार्थी हवालदील झाले आहेत. फेर्‍या मारुनही त्यांना धान्य मिळत नाहीत, त्यामुळे रेशन दुकानात धान्य असतानाही आर्थिक गटातील लाभार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

रायगड जिल्ह्यात दोन हजार महसुली गावे आहेत. त्यात पाच लाख 39 हजार 822 रेशन कार्ड आहेत; तर 17 लाख 51 हजार 314 लाभार्थी आहेत. ई-पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून धान्य वाटप केले जाते. यासाठी पुरवठा विभागाकडून वापरण्यात येणार्‍या आरसीएमएस सॉप्टवेअर अद्यावत करण्यात येत आहे; मात्र, याची कोणतीही कल्पना रेशन दुकानदारांना न दिल्याने धान्य वाटपात गोंधळ उडाला आहे. ई-पॉस मशीन सुरू केल्यानंतर त्यात ग्राहक क्रमांक म्हणजेच आरसी नंबर टाकले जाते. यानंतर मशीनमध्ये संबंधित कार्डधारकाचा धान्याचा कोटा येतो. या प्रक्रियेनंतर मशीन लगेच बिल दाखविते. परंतु सध्या ई-पॉस मशीन बिल दाखवितच नाही आहे. सात ते आठवेळा प्रयत्न केल्यानंतर बिल निघत नाही. त्यामुळे बिलशिवाय धान्य वाटप करणे शक्य नाही. ट्रान्झक्शनची माहितीही दुकानदारांना देत येत नाही. अनेक दुकानदारांना सुरुवातीचा धान्याचा कोटा देखील दिसत नाही परिणामी किती धान्य वाटप झाले ते माहित होत नाही. यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे धान्य वाटप करू शकत नाही, असे म्हणणे रायगड जिल्ह्यातील दुकानदारांचे आहे. धान्य मिळत नसल्याने महिन्याच्या शेवटी धान्य घेण्यासाठी येणार्‍या अनेक कार्डधारकांना रेशन न घेताच परत जावे लागत आहे. दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी युद्धपातळीवर अपडेशनचे काम सुरु असून तरी देखील अडचण येत असेल तर शिधापत्रिका धारकांना ऑफलाईन धान्य वाटप करण्याचा प्रयत्न केला लाईल असे सांगितले.

सर्वरला सतत येणार्‍या तांत्रिक समस्या यामुळे धान्याचे ऑनलाईन वितरण होत नाही. कार्डधारक सकाळी सात वाजल्यापासून दुकानांसमोर ताटकळत उभे असतात दुकानात प्रत्यक्ष धान्य साठा शिल्लक असून सुद्धा मशीन वर धान्य उपलब्ध होत नसल्यामुळे धान्य वितरीत करता येत नाही. – महेंद्र पाटील, अध्यक्ष- अलिबाग तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटना

सॉप्टवेअर अपडेट केले जात असल्याने ही समस्या उद्भवली असून एक-दोन दिवसात हे काम पुर्ण होऊन चांगल्या क्षमतेने आणि जलदगतीने धान्य वाटपाच्या नोंदी करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर या प्रणालीमध्ये जास्तीत जास्त माहिती साठवून ठेवली जाणार आहे. जी रास्त भाव दुकानदारांना उपयोगी पडेल. तरी देखील अडचण येत असेल तर ऑफलाईन प्रणालीने धान्य वाटप करण्याचा प्रयत्न केला जाईल. – मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी – रायगड

Exit mobile version