| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलोनीत एक हृदयद्रावक घटना घडली. सकाळी अंदाजे 4:30 ते 5:00 च्या सुमारास भीषण आगीने एका कुटुंबातील सात जणांचा जीव घेतला. या दुर्घटनेत दोन लहान मुलांचाही समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. इतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ कॉलनीच्या के. एन. गायकवाड मार्गावरील गांगुर्डे प्लॉट नंबर १६ येथील छेदिराम अलगुराम गुप्ता (70) यांच्या राहत्या घराला आग लागली. गुप्ता यांचे राहते घर १+२ पोटमाळ्याचे असून घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते. या दुकानामध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली. दुकानात लागलेली आग रॉकेलच्या बॅरेलमुळे जास्त भडकली. त्यावेळी छेदिराम गुप्ता व त्यांचा मुलगा धर्मदेव गुप्ता हे घराबाहेर पडले. मात्र घरामध्ये गीतादेवी छेदिराम गुप्ता, अनिता धर्मदेव गुप्ता, विधी धर्मदेव गुप्ता, नरेंद्र धर्मदेव गुप्ता, प्रेम छेदिराम गुप्ता, मंजू प्रेम गुप्ता हे घरातच अडकून पडले. त्यामुळे सर्वजण आगीमुळे होरपळले. स्थानिक आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जखमींना चेंबुरच्या झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत प्रीती प्रेम गुप्ता ही जखमी असून तिला पुढील उपचाराकरता राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या व ॲम्बुलन्स पोहोचल्या होत्या. घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यात आली असून पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.