| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि अल्टो कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.16) मध्यरात्री 1.30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरीतील सारसाळे, कोशिंबे आणि देवठाण येथील तीन कुटुंबे नाशिकमध्ये एका नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपवून रात्री ते अल्टो कारने आपापल्या गावी परतत होते. दिंडोरीतील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर त्यांच्या कारची एका मोटरसायकलशी धडक झाली. या धडकेनंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या नाल्यात जाऊन उलटली. कार पाण्यात पूर्णपणे बुडाल्याने आणि दरवाजे लॉक झाल्याने आतील कोणालाही बाहेर पडता आले नाही. त्यामुळे नाका तोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या अपघातात देविदास गांगुर्डे (28) नाशिक, मनीषा गांगुर्डे (23), उत्तम जाधव (42), रा-कोशिंबे, अल्का जाधव (38), रा. कोशिंबे, दत्तात्रेय वाघमारे, (45), रा. देवपूर, अनुसया वाघमारे (40), रा. देवपूर आणि भावेश गांगुर्डे (2) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात मोटरसायकलवरील मंगेश कुरघडे (25) आणि अजय गोंद (18) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





