| रसायनी | वार्ताहर |
दुर्गांमाता काॅलनी चांभार्ली येथील विजय तायडे यांचा चुलत भाऊ सुमित संजय तायडे (17) याचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. रंगाने सावळा, चेहरा गोल, उंची 5 फुट 5 इंच अंदाजे, अंगाने सडपातळ, अंगात पांढ-या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट असे अपहरण झालेल्या मुलाचे वर्णन आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तो पेंटर रवि संतोष कुमार यांच्या सोबत इस्पात कंपनी येथे पेंटींग काम करण्यास गेला होता. त्यानंतर कामावरून परत येते वेळेस पेंटर रवि कुमार यांनी सिद्धेश्वरी कॉर्नर येथे सुमित यास रिक्षात बसवून दिले. त्यानंतर तो घरी पोहचला नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सुमित यास त्याचे अज्ञानपणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले आहे. यासाठी तायडे कुटूंबाने नातेवाईक व गावात इतरत्र शोधही घेतला. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक अनुसया ढोणे, पोलिस पाटील अधिक तपास करीत आहेत.







