ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक यांच्यावर दि. 5 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत ग्रामपंचायतीचा कार्यभार कोणत्याही अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला नसल्याने गावातील प्रशासन ठप्प झाले आहेत. गावात आता पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील पाईपलाईन फुटल्यामुळे सुमारे अर्ध्या गावाला गेल्या काही दिवसांपासून पाणी मिळत नसून तोंडसुरे पाणीपुरवठा योजनेचा पाच ते सहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. या समस्येबाबत निर्णय घेण्यासाठी किंवा नागरिकांना समाधानकारक उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायतीत कोणताही अधिकारी उपलब्ध नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी माधव जाधव यांच्याकडे केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी जाधव यांची भेट घेतली असता, वरून आदेश येत नाही तोपर्यंत कोणालाही नेमणूक देऊ शकत नाही, असे उत्तर देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गैरव्यवहाराच्या प्रकरणात कारवाई झाली असली तरी त्याचा फटका सामान्य ग्रामस्थांना बसत असल्याची नाराजीही यावेळी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस महादेव पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन खारगाव खुर्द ग्रामपंचायतीत तात्काळ अधिकारी नियुक्त करून प्रशासन सुरळीत करावे अशी मागणी केली आहे. दोन दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास समस्त ग्रामस्थांचे शिष्टमंडळ लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.







