तळोजात गंभीर पाणीटंचाई

ऐन आचारसंहितेमध्ये नागरिकांवर आंदोलनाची वेळ

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

मागील तीन महिन्यांपासून तळोजा वसाहतीमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तीव्र पाणीटंचाईने तळोजा येथील रहिवासी त्रस्त असून, तळोजा फेज 1 आणि 2 सीएचएस फेडरेशनमार्फत सोमवारी (दि. 22) घेण्यात आलेल्या बैठकीत पाणीपुरवठासंदर्भात सीडकोवर तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय पाणी कमी पडते म्हणून टँकरची मागणी सिडको अधिकाऱ्याकडे केली असता सिडको अभियंता राहुल सरोदे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक आणि अरेरावी सोसायटी रहिवाशांना सहन करावी लागत आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

सिडकोकडून पाणीपुरवठा होत नाही आणि टँकरनेही पाणीपुरवठा केला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये खासगी टँकरचा सहारा घ्यावा लागतो आणि त्याचा खर्च प्रचंड आहे. मध्यम आकाराच्या सोसायटीला जवळजवळ दरदिवसा दहा ते पंधरा खासगी टँकर विकत घ्यावे लागतात. त्याचा खर्च दरदिवसा सव्वीस ते तीस हजार इतका आहे. हे सिडको नियोजित शहर आहे. सिडकोने इमारती बांधण्यापूर्वी पाण्याचे पूर्वनियोजन करायला हवे होते. परंतु, तसे न करता आधीच पाण्याची टंचाई, त्यात नवनवीन शेकडो प्रकल्प आणून हजारो नवीन घरांची निर्मिती आजदेखील चालू आहे. याशिवाय महानगरपालिकासुद्धा कोणतीही पाण्याचे नियोजन नसताना परीक्षेत्रांमध्ये बिल्डिंगला परवाने आहेत. या सर्व बाबींना कंटाळून सोमवारी जवळपास 100 सोसायटीच्या सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तळोजा फेडरेशनकडे आंदोलनाची मागणी केली. त्यानुसार एक आठवड्याच्या आत सिडको पाणीपुरवठा कार्यालय, रायगड भवन, बेलापूर येथे तीव्र आंदोलन करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

तळोजा येथील उपस्थित सर्व सोसायटीच्या सदस्यांनी आजच्या बैठकीत आंदोलनाचा आग्रह धरला असून, त्यासाठी निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन व इतर शासकीय परवानग्यांसाठी सोमवारी पत्र दिले जाईल आणि प्रशासनाची परवानगी आल्यानंतर पाणीप्रश्नासंदर्भात तीव्र आंदोलन सिडको बेलापूर कार्यालयावर केले जाईल.

प्रसाद ढगेपाटील, अध्यक्ष, तळोजा फेज 1 आणि 2 सीएचएस फेडरेशन लि.
Exit mobile version