नवसूचीवाडीत भीषण पाणीटंचाई

विहिरीत थेंब नाही तरीदेखील शासनाचा टँकर नाही

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीमधील नवसूचीवाडीमधील पिण्याचे पाणी देणार्‍या विहिरी आटल्या आहेत. मार्च महिनापासून येथील 75 घरांतील आदिवासी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दोन्ही विहिरींमध्ये पाणी नाही, तरीही शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरु केला जात नसल्याने येथील महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. कर्जत पंचायत समितीचे पाणीटंचाई निवारण करणारे अधिकारी नवसूचीवाडीमधील पाणीटंचाई पाहण्यासाठी कधी येणार, असा प्रश्‍न आदिवासी बांधव विचारत आहेत.

नवसूचीवाडी दुर्गम भागात वसली असून, या वाडीमध्ये जाण्यासाठी दोन लहान डोंगर पार करून जावे लागते. वारे ग्रामपंचायतीमधील या वाडीचे पायथ्याशी नाल्याजवळ शासनाने विहीर बांधली आहे, मात्र त्या विहिरीचे बांधकाम ज्या जागेत झाले आहे ती जमीन खासगी असल्याने पाणीपुरवठाबद्दल अडथळे येत आहेत. ती विहीर वाडीपासून किमान दोन किलोमीटर लांब आहे. तर वाडीच्या आजूबाजूला आणखी दोन विहिरी असून, त्यातील एका विहिरीने मार्च महिन्यातच तळ गाठला होता, तर दुसर्‍या विहिरीत तुरळक पाणी आहे. ते पाणी आणण्यासाठी आदिवासी बांधवांना डोंगर उतरून जावे लागते. दरम्यान, पक्का रस्ता नसल्याने दगड गोटे असलेल्या पायवाटेने ये-जा करावी लागते. 75 घरांची वस्ती म्हणजे साधारण 400 ते 450 लोकांची वस्ती या वाडीमध्ये असून, मार्च महिन्यापासून येथील रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवांना वाडीमध्ये राहणे कठीण झाले आहे.

नवसूचीवाडीमधील पाणीटंचाई निर्माण झाली असताना पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून पाणीटंचाईची स्थिती जाऊन घेण्यात आलेली नाही. तर, शासकीय टँकर सुरू होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रशासक यांच्याकडून टँकरची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्याची गरज आहे.

Exit mobile version