पेटारवाडीमध्ये तीव्र पाणीटंचाई

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रुप ग्रामपंचायतीमधील पेटारवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तेथील पाण्याची विहीर आटली असून, त्या विहिरीमध्ये शासनाच्या टँकरमधून पाणी टाकण्यात येत आहे. मात्र, तेथील आदिवासी बांधवांना धुणीभांडी करण्यासाठी मोठी उतरण उतरून चिल्हर नदीवर जावे लागत आहे. त्यामुळे पाण्यासाठी चढाव चढून ये-जा करणे कठीण होऊन बसले आहे.

पेटारवाडी आदिवासी वाडी असून, या वाडीसाठी कोणतीही नळपाणी योजना नाही. तेथे वाडीच्या खालील भागात असलेल्या विहिरीमधून पाणी उचलून पिण्याचे पाणी आणायचे काम येथील आदिवासी बांधवांना करावे लागते. त्यात यावर्षी मार्च महिन्यातच विहीर आटली आणि पेटारवाडीतील आदिवासी बांधवांचे तोंडचे पाणी पळाले. परिणामी, त्यांना पाण्यासाठी चिल्हर नदीवर जावे लागत आहे. खांडस ग्रामपंचायतीकडून कर्जत पंचायत समितीकडे टँकरची मागणी करणारा प्रस्ताव केल्यानंतर कर्जत पंचायत समितीकडून पाण्याचा टँकर सुरु करण्यात आला आहे. पाण्याचा टँकर वाडीच्या खालील बाजूस उतारावर असलेल्या विहिरीमध्ये ओतण्यात येतो आणि तेथे वाडीमधील महिला पाणी आणण्यासाठी जात असतात. मात्र, कर्जत पंचायत समितीचा टँकर हा वेळेवर येत असल्याने ग्रामस्थांची तहान काही प्रमाणात भागली आहे.

Exit mobile version