पारा 12.0 अंश सेल्सियसवर
| माथेरान | वार्ताहर |
गिरीस्थान पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये कडाक्याची थंडी पडली असून, दिवसेंदिवस गारठा वाढत आहे. पार्याने या वर्षातील सर्वाधित नीचांक गाठला असून, सोमवारी (दि.04) 12.0 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हुडहुडी भरणार्या गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत आहेत.
माथेरान पर्यटनस्थळ हे समुद्रसपाटीपासून 803.66 मीटर उंचीवर असून, 700 हेक्टर घनदाट जंगलात व्यापलेले आहे. त्यातील 300 हेक्टर जंगल हे माथ्यावर असल्याने माथेरानमध्ये बाराही महिने थंडावा जाणवतो. या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमीच माथेरानला येत असतात. माथेरानचे तापमान नेहमी 13 अंश ते 29 अंश इतके असते. दरम्यान, राज्यभर उन्हाच्या झळा वाढत असताना माथेरानमधील पारा दिवसेंदिवस खाली घसरत आहे. 4 मार्च रोजी सकाळी तापमान 12.0 अंश इतके खाली गेल्याची नोंद करण्यात आली. यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमी तापमान असल्याचे तापमान निरीक्षक अन्सार महापुळे यांनी सांगितले. या विकेंडला माथेरानमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांनी येथील गुलाबी थंडीचा मनसोक्त आनंद लुटला. सकाळच्या वेळी वातावरणात सर्वत्र धुके पसरलेले दिसत होते.
दिनेश केरेकर, पर्यटक, मुंबई
मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असून, उकाड्याने हैराण झालो होतो. माथेरान हे गुलाबी थंडीसाठी खूप प्रसिद्ध असल्याने शनिवारी एक दिवसासाठी माथेरान येथे आलो होतो. येथील आल्हाददायक वातावरण व गुलाबी थंडीचा वेगळाच अनुभव मिळाला. येथील थंडगार वातावरणात, हिरव्यागार निसर्गात भटकंती केली. माथेरान हे खूपच युनिक पर्यटनस्थळ आहे.







