सावित्री नदीची गाळसफाई आवश्यक

। पोलादपूर । वार्ताहर ।
23 जुलै 2021 रोजी पोलादपूर शहरामध्ये उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र घुसल्याने मटनमार्केटपासून स्मशानापर्यंत जलप्रलय निर्माण झाला होता. यामागे सावित्री नदीचे पात्र दिवसेंदिवस उथळ होत असल्याने पुराचे पाणी शहरात तब्बल 8 ते 12 फूट उंचीपर्यंत पूररेषा गाठत असल्याचे दिसून आले आहे. चरई गावातील साळवीवाडी आणि सोनारवाडीलगत दगडगोटयांचे उंचवटे तयार झाल्याने पोलादपूर शहरातील पूरस्थितीनियंत्रणासाठी ठिकठिकाणी सावित्री नदीची गाळसफाई आवश्यक ठरत आहे.
2005 मध्ये पोलादपूर शहरातील उत्तरवाहिनी सावित्री नदीला आलेल्या पूरपरिस्थितीत चरई पुलाचा चरईबाजूकडील ऍप्रोच रोड वाहून गेला. 2021 मध्येदेखील चरई बाजूकडील ऍप्रोच रोड वाहून गेल्याने पुराचे पाणी या ऍप्रोच रोडमुळे परत शहराकडे वळून पुरस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज लावला जात असताना पुराच्या पाण्याच्या पातळीतील वाढ तब्बल 8 ते 12 फूट उंच असल्याचे दिसून आल्याने उत्तरवाहिनी सावित्री नदी पात्रातील पोलादपूर शहरालगतचा तसेच चरई गावातील साळवीवाडी आणि सोनारवाडीलगत गाळ उपसा करण्याची गरज स्पष्ट झाली आहे. महेंद्र सकपाळ यांनी संपूर्ण शहराच्या बाजूला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली असताना अन्य कोणत्याही राजकीय पक्षांना कोणत्याही उपाययोजना शासनाला सुचविण्यासंदर्भात सोयर सुतक नसल्याचे जाणवत आहे.
2022च्या आगामी पावसाळयात पुन्हा पोलादपूरकरांना पूरस्थितीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. केवळ 75 दिवसांवर यंदाची संभाव्य पूरस्थिती येऊन ठेपली असताना पोलादपूर शहरासह तालुक्यातील राजकीय पुढार्‍यांची मानसिकता पुरपरिस्थितीपूर्वी उपाययोजना करण्याऐवजी पुरबाधितांना मदतकार्य करण्याची दिसून येत आहे.

Exit mobile version