केटी बंधार्यांवर भंगार व अवशेष चोरांची नजर
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे केटी बंधार्यासंदर्भातील कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद झाले असून, दिवील आणि लोहारे या दोन्ही बंधार्यांची देखभाल दुरूस्ती तसेच जबाबदारी रामभरोसे झाली आहे. यामुळे हे दोन्ही केटी बंधारे रातोरात गायब करण्यात येण्याची शक्यताही तालुक्यात व्यक्त होत आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामस्थांकडून विविध विकासकामांची मागणी केल्यानंतर जुनी विकासकामे भुईसपाट करताना त्यातील काही भाग व अवशेष पुन्हा वापरात आणून नवीन कामांमध्ये बेमालूमपणे वापरणार्या बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांसाठी तालुक्यातील काही भंगार आणि अवशेष चोरांकडून बिल्डींग मटेरियल सप्लाय करण्याचे सौहार्दपूर्ण सहकार्य केले जात असते. याचाच भाग म्हणून दिवील आणि लोहारे येथील केटी बंधारे पोलादपूरच्या उत्तरवाहिनी सावित्री नदीला येणार्या पुराला कारणीभूत ठरवून भुईसपाट करण्याची मागणी दोन महिन्यांपूर्वी भंगार व अवशेष चोरांच्या सूचनेवरून शासनअमान्य डिजिटल माध्यमांकडून करण्यात आली होती.
दिविल आणि लोहारमाळ येथे तब्बल 35 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन कोल्हापुरी तंत्राच्या बंधार्यांपैकी दिवीलचा बंधारा जीर्ण झाला असताना 2005 च्या अतिवृष्टीमुळे आलेल्या उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या महापुरामध्ये वाहून गेला, तर लोहारमाळच्या बंधार्याला नदीच्या पात्रात वाहून आलेल्या झाडांच्या खोडांचे हादरे बसून तो कमकुवत झाला. त्यानंतर काही काळाने बंधार्याची डागडुजी करताना हिवाळी आणि उन्हाळी या बंधार्याखालून नदीच्या उथळ पात्रातून एसटीच्या गाड्यांसह अन्य प्रकारची वाहतूक सुरू झाली. हे काम संपल्यानंतर आजमितीस बंधार्यावरून वाहतूक सुरू राहिली असून, या बंधार्यावरून एसटीची गाडी अथवा लाकडाचे ओंडके भरलेले ट्रक जाऊ लागले की हा बंधारा थरथरत असल्याचा थरारक अनुभव अन्य वाहनांतील प्रवाशांसह बंधार्यावरून चालत जाणार्या पादचार्यांनाही घ्यावा लागत असे. यापैकी लोहारे येथील केटी बंधार्यालगत लोहारे तुर्भे पुलाचे बांधकाम होऊन तो कार्यान्वितही झाला आहे. मात्र, दिविल येथील केटी बंधारा 2005 साली अतिवृष्टी व महापूराच्या काळात फुटला आणि नादुरूस्त झाल्याने वाहतुकीस व रहदारीस अयोग्य ठरला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये 2005 साली तसेच 2021 साली या चरई पुलाच्या चरई गावालगतच्या अॅप्रोच रोडचा भराव वाहून गेल्याने दोनवेळा अॅप्रोच रस्त्याचे बांधकामदेखील करण्यात आले. मात्र, गेल्या तीन वर्षांपूवी पोलादपूर तालुक्यातील काँक्रिटचे रस्ते, लोखंडी पूल, खडी व लालमाती तसेच इमारतीचे अवशेष यांचा वापर सर्रास सरकारी विकासकामांमध्ये करणार्यांनी काही महिन्यांपासून दिवील आणि लोहारे येथील कोल्हापुरी तंत्राच्या म्हणजेच केटी बंधार्यांमुळे पोलादपूर शहरात पुरस्थिती निर्माण होत असल्याच्या चर्चा घडविल्या. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही केटी बंधार्यांवरून उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या पुराचे पाणी वाहात असल्याने हे दोन्ही बंधारे पोलादपूर शहरातील पुरास कारणीभूत नसल्याचे उघड आहे.
लोहारमाळ गावाच्या हद्दीतील कोल्हापुरी तंत्राच्या बंधार्याचा उपयोग सध्या तुर्भे खोंडा, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, वझरवाडी, दिवील आणि हावरे भागात जाण्यासाठी तेथील ग्रामस्थ करीत असताना त्याठिकाणी नवीन लोहारे तुर्भे पूल उभारण्यात आला. या पुलाच्या उत्तरेला पूर्वीचा केटी बंधारा आहे. त्यामुळे पोलादपूर चरई पुलानंतर लोहारेतील नवीन पूल आणि त्यानंतर लोहारे केटी बंधारा तसेच तेथून दोन कि.मी अंतरावर दिवील येथील केटी बंधारा असल्याने या पुलांमुळे पोलादपूर शहरातील पूरस्थिती कशी निर्माण होईल, असा सवाल तालुक्यातील सुज्ञ जनतेला सतावू लागला असताना, या केटी बंधार्यांना चांगल्या दर्जाचे तोडीचे ताशीव दगड असून, ते दगडी इमारत आणि लोडबेअरिंग जोत्याच्या बांधकामांना उपयुक्त असल्याने दोन्ही केटी बंधारे पोलादपूरच्या पूरस्थितीला कारणीभूत असल्याची चर्चा घडवून नजीकच्या काळात दोन्ही केटी बंधारे पाडून परस्पर त्यांची वासलात लावण्याचा डाव भंगार व अवशेषांचा विकासकामे आणि भरावासाठी वापर करणार्यांकडून होणार असल्याचे संकेत काही बांधकाम व्यावसायिकांकडून देण्यात येत आहेत.