चिखल अंगावर उडाल्याने वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील 17 वर्षांपासून रेंगाळले आहे. मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेल्या या महामार्गाची दुरवस्था आजही कायम आहे. पावसाळ्यात तर हा मार्ग प्रवास करण्याच्या लायकीचा उरत नाही. फोर व्हीलर वाल्यांनो जरा दमानी, अंग भिजतेय हो चिखलानी…..अस म्हणण्याची वेळ दुचाकी स्वार व पादचारी यांच्यावर आली आहे.
सध्या या मार्गावर सर्वत्र चिखल, खड्ड्यात साचलेली पाणी, दगड गोटे आणि पसरलेली खडी ही मोठी समस्या झाली आहे. या मार्गावरून जाणारे पादचारी, दुचाकीस्वार या समस्येने अक्षरशः बेजार झाले आहेत. ऐन सणात या मार्गावर वाद निर्माण होत आहेत. वेगवान चारचाकी, एसटी बस किंवा इतर मोठी वाहने वेगात जातात, अशावेळी येथील चिखल किंवा खड्ड्यात साचलेले पाणी दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्या अंगावर जोरात उडते. आणि कपडे घाणपाणी अथवा चिखलाने रंगून जातात, मग संतप्त नागरिकांकडून ते मोठे वाहन अडवून वादाच्या घटना घडतात. असाच प्रकार नागोठणे ते वाकणच्या दरम्यान नुकताच घडला. एक चारचाकी इनोव्हा वाहन चालक वेगात जाताना चिखलातून गेला, आणि तो चिखल दुचाकी प्रवाशांच्या अंगावर उडाल्याने त्यांचे कपडे खराब झाले. त्यामुळे बराच वेळ इथं वाद झाला. वाहनचालकाला दोन दुचाकीस्वारांनी समज दिली व सोडून दिले. महत्त्वाच्या कामासाठी जात असताना अशी घटना घडली तर काम खोळंबते, शिवाय मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून अपघातही होऊ शकतो, तर मळलेले कपडे पुन्हा कपडे बदलण्यासाठी जाण्यात वेळ जातो, मानसिक त्रास ही होतो, त्यामुळे चिखल आणि खड्ड्यातून वाहने हळू चालवा, असे आवाहन पाली बुरमाळी येथील जितेंद्र कांबळे यांनी सांगितले.