दादर पुलावरील गटाराचे काम संथ गतीने

कामावरती फक्त दोनच मजूर; वाहतूक कोंडीने चालक त्रस्त

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन बाजारपेठेतील दादर पुलाजवळ भवानी स्वीट मार्टच्या समोर अंदाजे वीस मीटर लांबीच्या गटाराचे काम सुरू करण्यात आलेले आहे. पूर्वी या ठिकाणी दगडी पिचिंगचे बांधकाम केलेले होते, ते अत्यंत जुने झालेले असल्यामुळे अनेक ठिकाणी कोसळत होते. त्यामुळे नगरपरिषदेने सदरचे गटार आरसीसी बांधण्याचा निर्णय घेतला व त्यासंबंधित कामाची जाहीर निविदा काढून संबंधित ठेकेदाराला काम करण्यासाठी वर्क ऑर्डरदेखील देण्यात आलेली आहे.

ज्या ठिकाणी गटाराचे काम सुरू आहे, तो रस्ता अत्यंत रहदारीचा असून, सकाळ, दुपार, संध्याकाळ त्या ठिकाणी वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. गटार खोदलेले असल्यामुळे गटारातील काढलेला मलबा, दगड, त्याचप्रमाणे माती रस्त्यावर एका बाजूला रचून ठेवल्यामुळे सदर परिसरामध्ये रस्ता अत्यंत अरुंद असा शिल्लक राहिलेला आहे. त्यातच नेहमीप्रमाणे श्रीवर्धन बाजारपेठेत वेड्यावाकड्या दुचाकी उभ्या करणार्‍या दुचाकीस्वारांमुळे सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

संबंधित ठेकेदाराने कामावरती केवळ दोनच मजुरांची नियुक्ती केली आहे. जर त्या ठिकाणी जास्त मजूर लावून हे काम लवकरात लवकर आटोपले असते, तर नागरिकांनादेखील सोयीचे झाले असते. तरी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकार्‍यांनी सदर ठेकेदाराला सूचना देऊन कामावरती जास्त मजूर लावून काम दोन दिवसांमध्ये समाप्त करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Exit mobile version