| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन नगरपरिषदेने जलशुद्धीकरण प्रकल्प व शहरातील जलवाहिन्या बदलण्याच्या कामाची निविदा काढली होती. गेल्या वर्षी पावसाळ्या अगोदर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे व जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पावसाळ्या अगोदर रानवली तलाव ते आराठी या ठिकाणापर्यंत नवीन जलवाहिन्या टाकून झाल्या होत्या. यावर्षी पावसाळा संपल्यानंतर श्रीवर्धन शहरातील जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. संबंधित ठेकेदाराने जलवाहिन्या बदलण्याचे काम जवळजवळ पूर्ण केले असून जलवाहिन्या बदललेल्या ठिकाणी खोदकाम केल्यामुळे त्या ठिकाणचे डांबरीकरण राहून गेले आहे. सदर ठेकेदाराने अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरलेली असून या खडीवरून अनेक दुचाकीस्वार पडलेले आहेत. सदर पसरलेल्या खडीवरती रोलर फिरवलेला नसल्यामुळे अनेक अवजड वाहने त्या ठिकाणी खचलेली पाहायला मिळतात. ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे काम रखडलेले असून शहरातील नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी रोलर फिरवून रस्ता करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.