दोन हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय नोटबंदीच्या भयंकर आठवणी जागवणारा आहे. मात्र नोटा बदलून मिळण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंतची म्हणजे चार महिन्यांची मुदत असल्याने घबराटीचे कारण नाही. नोव्हेंबर 2016 मध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रातोरात रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला होता. त्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास झाला होता. देशातील काळा पैसा या मोठ्या नोटांमध्ये साठवलेला असून तो नष्ट करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे तेव्हा मोदी म्हणाले होते. प्रत्यक्षात त्यावेळी चलनात असलेल्या पाचशे आणि हजारांच्या 99 टक्के नोटा परत करण्यात आल्या असे रिझर्व्ह बँकेनेच नंतर जाहीर केले. याचा अर्थ काळा पैसा हा मुळात या नोटांच्या स्वरुपात साठवलेलाच नव्हता किंवा ज्यांनी तो साठवलेला होता त्यांनी जुगाड करून त्याला काळ्याचा पांढरा करण्यात यश मिळवले होते. ते काहीही असले तरी मोदींचा मूळ उद्देश सफल झाला नव्हता हे नक्की. गंमत म्हणजे अर्थव्यवस्थेत पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करत असतानाच सरकारने तेव्हा दोन हजारांची नवीन नोट प्रचारात आणली होती. एकीकडे मोठ्या रकमांच्या नोटांमुळे काळे धंदे वाढतात असे म्हणत म्हणत सरकारने केलेली ही कृती आश्चर्यकारक होती. तेव्हा दोन हजारांची नोटही कालांतराने चलनातून रद्द होईल असे सांगितले गेले होते. तो कालावधी सात वर्षांचा निघाला. दोन हजारांची नोट अजून तरी पूर्णपणे बाद केलेली नाही. सध्या चलनात राहून नोटा खराब होतात वा चुरगळतात म्हणून त्या वितरणातून काढून घेत आहोत असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात या निर्णयाचे फारसे परिणाम जाणवणार नाहीत. कारण, 2018 सालापासूनच दोन हजारांच्या नोटेची छपाई कमी करण्यात आली होती. रोजच्या व्यवहारात ती दिसेनाशी झाली होती. अनेकांनी तर ती गेल्या दोन-तीन वर्षात पाहिलीही नसावी. 2018 मध्ये एकूण चलनाच्या 37 टक्के नोटा या दोन हजारांच्या होत्या. आता ते प्रमाण सुमारे अकरा टक्के इतकेच राहिले आहे. या स्थितीत आता अचानक हा निर्णय जाहीर करण्याची कारणे राजकीयच असण्याची शक्यता अधिक आहे. कर्नाटकाच्या अपयशानंतर घसरती लोकप्रियता सावरण्यासाठी यासारखे अनेक निर्णय आता घेतले जातील असे दिसते. आता, मोदींनी काळ्या पैशाविरुध्द पुन्हा एकवार मास्टरस्ट्रोक हाणल्याचा प्रचार त्यांचे भक्त सुरू करतील. दुसरे म्हणजे, निवडणूक निधी गोळा करण्याचा हा एक प्रयत्न नसेलच असे सांगता येत नाही. सध्या दोन हजारांच्या नोटेच्या रुपात चलनामध्ये सुमारे चार लाख कोटी रुपये आहेत. हे पैसे असणार्यांपैकी बहुतेक जण व्यावसायिक असणार हे उघड आहे. त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ही नोट का आली आणि का गेली याची उत्तरे भविष्यात कधी तरी मिळतील अशी अपेक्षा आहे.