अजय तिवारी
लोकसभा निवडणुकीअगोदर विधानसभा निवडणुकीला यंदा सामोरे जाणार्या पाच राज्यांमध्ये छत्तीसगडचा समावेश आहे. एकीकडे काँग‘ेसने विधानसभेबरोबरच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपने साम, दाम, भेद, दंड नीती वापरून राज्य ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः या राज्यात लक्ष घातले आहे. त्याच वेळी काँग‘ेसमध्येही सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
छत्तीसगडमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग‘ेसनेही त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी पक्ष असल्याने काँग‘ेसचा प्रचारही जोरात सुरू आहे. काँग‘ेस पक्षाची तयारी केवळ विधानसभा निवडणुकीसाठी सुरू नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही पक्षाने उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. काँग‘ेसचे दहा हजार कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत. महिनाभरात काँग‘ेसने विभागीय बैठकांपासून बूथपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यातल्या पाच प्रमुख विभागांमध्ये बैठका घेतल्या. यानंतर विधानसभा स्तरावर प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. भाजपने जसे बूथ लक्ष केंद्रीत करून नियोजन केले आहे, तसेच काँग‘ेसनेही ‘बूथ चलो’ अभियान सुरू केले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मंत्री संपर्क साधणार आहेत. राज्यात 23 हजार बूथ आहेत. तिथे काँग‘ेसने संघटनात्मक काम सुरू केले आहे. काँग‘ेस येत्या काही दिवसांमध्ये 23 हजार बूथपर्यंत पोहोचणार आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर 2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच काँग‘ेस राज्यातील लोकसभेच्या 11 जागांसाठीही रणनीती बनवत आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोहन मारकाम यांनी विधानसभेसोबतच लोकसभेची तयारी सुरू केली आहे, असे सांगितले.
एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे भाजपनेही विधानसभा आणि लोकसभेची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडवर लक्ष केंद्रीत केले आहे. छत्तीसगडमधील दुर्ग येथील रविशंकर स्टेडियममध्ये त्यांनी मोठी जाहीर सभा घेऊन प्रचारही सुरू केला. त्यांनी मु‘यमंत्री भूपेश बघेल यांना ‘तुमची उलटी गणती सुरू झाली आहे’ अशा भाषेत बजावत राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचे सांगितले. सभेतील लोकांना विचारून त्यांनी देशात आणि राज्यातही भाजपचे सरकार येणार असल्याचे सांगितले. छत्तीसगड सरकार हे आश्वासने मोडणारे सरकार आहे. त्यांनी दारूबंदीची चर्चा केली; पण प्रत्यक्षात केली नाही. दहा वर्षात काँग‘ेसने 12 लाख कोटी रुपयांचा भ‘ष्टाचार केला, असा आरोप करताना भाजपने गेल्या नऊ वर्षांमध्ये केलेल्या कामांचा आढावा घेतला. मोदी यांनी आपल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत इतके पारदर्शक सरकार चालवले की विरोधकांनाही भ‘ष्टाचाराचा आरोप करता आला नाही, असे ते म्हणाले.
काँग‘ेस सरकारने दारू घोटाळा, कोळसा घोटाळा, गोठा घोटाळा केला. छत्तीसगडमध्ये एक हजाराहून अधिक शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या; बलात्काराचे पाच हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले. छत्तीसगडमध्ये धान खरेदीसाठी मोदी सरकारने नव्वद टक्के रक्कम दिली आहे. धान खरेदीची व्यवस्था माजी मु‘यमंत्री डॉ.रमण सिंग यांनी केली होती, असे शहा यांनी निदर्शनास आणले. त्यांनी पांडवानी गायिका उषा बरले यांच्या निवासस्थानी भेट दिली. एकीकडे त्यांनी वेगवेगळ्या समाजघटकांशी संपर्क साधला असताना दुसरीकडे काँग‘ेसमध्ये मात्र वाद उफाळून आला. पक्षाचे प्रभारी आणि राज्याच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये सर्वच ठिकाणी जसा वाद सुरू असतो, तसाच छत्तीसगडमध्येही झाला. त्याची मोठ्या प्रमाणात जाहीर वाच्यता झाली. निर्णयांना आव्हान दिले गेले. छत्तीसगड प्रदेश काँग‘ेस समितीच्या काही सदस्यांना नवीन जबाबदारी देण्याबाबत प्रदेशाध्यक्ष मोहन मारकम यांनी आदेश दिल्यानंतर राज्याच्या प्रभारी कुमारी सेलजा यांनी हा आदेश रद्द केला. राज्यातील संघटना आणि पक्षश्रेष्ठींच्या प्रतिनिधींमधील अंतर वाढत आहे. दरम्यान, प्रदेश काँग‘ेस कमिटी पक्षश्रेष्ठींच्या सूचनांचे पालन करेल, असे मारकाम यांनी स्पष्ट केले. तथापि, सेलजा यांच्या सूचनेनुसार काँग‘ेस नेते रवी घोष यांची प्रशासन आणि संघटना महासचिवपदी नियुक्ती करण्याबाबत कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.
तत्पूर्वी मारकाम यांनी राजनांदगाव येथे पत्रकारांना सांगितले की सेलजा यांनी यापूर्वी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याच्या आदेशाचा आढावा घेतला आहे. काही समस्या असल्यास आम्ही बसू, चर्चा करू आणि सोडवू. सेलजा यांचा प्रत्येक आदेश आम्हाला मान्य आहे. छत्तीसगड प्रदेश काँग‘ेस समिती त्यांच्या प्रत्येक आदेशाचे आणि सूचनांचे पालन करते. काँग‘ेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार, प्रदेश काँग‘ेस अध्यक्ष मारकाम यांनी या महिन्याच्या 16 तारखेला संघटनेत फेरबदल करण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशानुसार काँग‘ेस नेते अरुण सिसोदिया यांची राजनांदगाव जिल्ह्याच्या प्रभारीपदावरून बदली करण्यात आली. रवी घोष यांची बस्तर विभागाच्या प्रभारीपदी बदली करण्यात आली. रायपूर शहर युवक काँग‘ेसचे प्रभारी अमरजित चावला यांची एनएसयूआयच्या उपाध्यक्षपदी, रायपूर शहराच्या प्रभारी प्रतिमा चंद्राकर यांची राजनांदगावच्या प्रभारीपदी, सरचिटणीस चंद्रशेखर शुक्ला यांची मोहलाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोंडागावचे प्रभारी यशवर्धन राव यांची प्रशिक्षण प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मारकम यांच्या या आदेशानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मु‘यमंत्री बघेल यांनाही या नियुक्त्या मान्य नव्हत्या. त्यातून प्रदेशाध्यक्ष आणि मु‘यमंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले. दोघे शह-काटशहाचे राजकारण करतात.
प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतर प्रदेश प्रभारी कुमारी सेलजा यांनी 21 जून रोजी मोहन मारकम यांना पत्र लिहून 16 जूनचा आदेश रद्द केला. सेलजा यांनी मारकम यांना संबोधित करताना पत्रात म्हटले आहे की, छत्तीसगड प्रदेश काँग‘ेस कमिटीमध्ये रवी घोष यांच्याकडे सरचिटणीस प्रभारी, प्रशासन आणि संघटना या पदाची जबाबदारी देण्यात यावी आणि या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. मु‘यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग‘ेसच्या सूत्रांनी सांगितले. या बैठकीत मु‘यमंत्री भूपेश बघेल, कुमारी सेलजा, मोहन मारकम यांच्यासह काही मंत्रीही उपस्थित होते. काँग‘ेसमधील या निर्णयाकडे पक्षातील अंतर्गत कलह म्हणून पाहिले जात आहे. छत्तीसगड काँग‘ेसमध्ये सारे काही आलबेल नाही, हे या घटनेवरून लक्षात येते. काँग‘ेसच्या छत्तीसगडच्या प्रभारी कुमारी सेलजा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोहन मारकाम यांच्यात खडाजंगी झाली आहे. रवी घोष यांना सरचिटणीसपद बहाल करण्याचा सेलजा यांचा निर्णय मान्य करण्यास मारकम यांनी नकार दिल्याने हा वाद चव्हाट्यावर आला. मारकम यांनी दोघांमध्ये कोणतेही वाद नसल्याचे सांगितले होते. किंबहुना, या आदेशाचा फेरविचार करण्यात येईल, या त्यांच्या पूर्वीच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, काही समस्या असल्यास आम्ही एकत्र बोलून सोडवू. काँग‘ेस पक्षात शिस्त आहे आणि सर्वजण पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करतात.
मारकम यांच्या वक्तव्यानंतर सेलजा दि‘ीला रवाना झाल्या. त्यांनी सांगितले की मारकम यांच्या वक्तव्यामुळे आपण माघारी निघालो नाही. आमच्यात वादाचा कोणताही मुद्दा नाही. स्थानिक माध्यमांनी मारकम यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केले. मात्र बघेल यांचे निकटवर्तीय नेतेही मारकम यांच्या वक्तव्यावर खूश नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा मुद्दा मांडत आहोत; मात्र दि‘ीचे नेते ऐकत नाहीत. सेलजा नाराज असल्याचेही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. बहुधा त्या या विषयावर पक्षप्रमुखांशी बोलतील. मारकम यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. छत्तीसगड काँग‘ेसमध्ये सध्या कथित गटबाजी आणि भांडणे पाहायला मिळत आहेत. भाजप आणि आम आदमी पक्ष या प्रकरणी काँग‘ेसला कोंडीत पकडण्यात प्रयत्न करत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग‘ेसमधील गदारोळाचा केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी खरपूस समाचार घेतला. एकंदरीत, मारकम यांच्यामुळे पक्ष संघटनेतील वाद वाढला आहे. यावरून काँग‘ेसमधील गटबाजी स्पष्ट होते. विधानसभेच्या निवडणुकीत ती कितपत मारक ठरते, हे समजण्यास पाच महिने वाट पहावी लागेल.