| पनवेल । वार्ताहर ।
वेश्यागमनासाठी व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून सेक्सरॅकेट चालवणार्या महिला दलालासह दोघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघरमधून सापळा लावून अटक केली आहे. तसेच त्यांच्या तावडीतून दोन मुलींची सुटका केली आहे.
खारघर परिसरातील दलाल समीर (फिरोज खान) तसेच त्याच्या दोन महिला सहकारी हे तिघेही ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे वेश्यागमनासाठी मुलींचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याला मिळाली होती. या दलालांनी वेश्यागमनासाठी त्याच्या व्हॉट्सअॅपवर काही मुलींचे फोटो पाठवल्याने त्याने त्यातील दोन मुलींचे 50 हजार रुपये दर ठरवून त्यांच्याशी संपर्क ठेवला होता. या दलालांनी दोन्ही मुलींना खारघरमधील एका हॉटेलमध्ये वेश्यागमनासाठी पाठवणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याने याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला कारवाई करण्यासाठी दिली. त्यानुसार व.पो.नि.अतुल आहेर व त्यांच्या पथकाने बनावट ग्राहकांच्या माध्यमातून हॉटेल जवळ सापळा रचून दोन दलालांना ताब्यात घेतले. तसेच त्यांनी वेश्याव्यसायासाठी आणलेल्या दोन मुलींची सुटका केली.