प्रियकराकडून प्रेयसीवर लैंगिक अत्याचार

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल भागात राहणार्‍या एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर मागील वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करुन तिचे अश्‍लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. खांदेश्‍वर पोलिसांनी या तरुणाविरोधात बलात्कारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील 23 वर्षीय पिडीत तरुणी आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा तिचा 23 वर्षीय प्रियकर दोघेही पनवेल भागात राहण्यास असून दोघेही एकमेकांचे दुरचे नातेवाईक आहेत. दोघेही एकाच परिसरात राहण्यास असल्याने त्यांच्यामध्ये मागील वर्षभरापासून प्रेमसंबंध सुरु झाले होते. यादरम्यान, आरोपी तरुणाने पिडीत तरुणीला विमलवाडी येथे भाड्याने घेतलेल्या आपल्या घरामध्ये नेऊन तिच्यावर अनेकवेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मागील 2-3 महिन्यांपर्यंत या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु होते. यादरम्यान, या तरुणाने पिडीत तरुणीचे आपल्या मोबाईलवरुन व्हिडीओ आणि फोटो काढले. गत महिन्यामध्ये या तरुणीने आरोपीसोबत शररीसंबंध करण्यास नकार दिला असता, त्याने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच, तिचे आश्‍लिल फोटो आणि व्हिडीओ तिच्या वडीलांना दाखविण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने पिडीत तरुणीचे अश्‍लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले. या प्रकारानंतर पिडीत तरुणीने खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version