रत्नागिरी | वृत्तसंस्था |
सोशल मीडियावरून मैत्री केल्यानंत तरूणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुली आणि महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना सध्या घडत आहेत. असाच एक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीशी तरूणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवली. त्यानंतर ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्याशी मैत्रीसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. चार महिन्यांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. हा तरूण तिला धमकावत होता. तसेच मारहाणही करत होता, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.






