अॅड. निहा राऊत यांची अध्यक्षपदी नियुक्ती
| अलिबाग | प्रतिनिधी |
महिलांच्या सुरक्षेसाठी लैंगिक छळ तक्रार समिती गठीत करण्यात आली असून, अलिबागच्या ज्येष्ठ वकील अॅड. निहा अनिस राऊत यांची अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर “स्थानिक तक्रार निवारण समिती“ ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची प्रभावीपणे चौकशी व निवारण होणार आहे. त्यानुसार, प्रत्येक कार्यालयात अशा प्रकारच्या तक्रारींच्या निवारणासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात “स्थानिक तक्रार निवारण समिती“ गठीत करण्यात आली आहे. यात अॅड. निहा अनिस राऊत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर माधवी समीर धारिया, एस. एम. वाघमारे, सुषमा शेषराव ढाकणे, सुहिता ओव्हाळ यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही समिती महिलांच्या तक्रारी ऐकून त्याचे योग्य चौकशी व निर्णय घेईल, जेणेकरून महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व भयमुक्त कामाचे वातावरण मिळेल. अलिबागमधील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ वकील अॅड. निहा राऊत यांची या समितीवर सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे व त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
