। म्हसळा । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा म्हसळा येथे विद्यार्थ्यांच्या अंगी असणार्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर यांच्या नियोजनातून शाळेत शाडूच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
दिवसेंदिवस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्याचे प्रमाण वाढत असून, ते पर्यावरण संतुलन बिघडविण्याचे काम करीत आहे, त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्याची जाणीव आणि जागृती या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी समाजाला करून दिली. गणपती उत्सव हा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, उत्सवामध्ये मूर्ती बनविण्यासाठी बहुतांश प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. परंतु, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या पाण्यात विरघळत नाहीत. मूर्ती नदी, नाले, समुद्र, विसर्जन तलाव आणि अन्य ठिकाणी पाण्यावर तरंगत राहतात. पर्यायाने मूर्तिची विटंबना होण्याची भीती असते आणि जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. जलप्रदूषण कमी होण्यासाठी तसेच निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त गणेशभक्तांनी शाडूच्या मूर्ती वापराव्यात आणि प्रदूषण टाळण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याध्यपिका सुमित्रा खेडेकर यांनी केले आहे. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर यांच्यासह शिक्षिका जयश्री गायकवाड, इंदिरा चौधरी, शिक्षक उमदी यांनी मेहनत घेतली.