। फ्लोरिडा । वृत्तसंस्था ।
टी वर्ल्ड कप 2024 मध्ये नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात 37 वी मॅच झाली होती. ही मॅच 17 जूनला झाली होती. या मॅचमध्ये बांगलादेशनं 21 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, या मॅचमध्ये एक वादग्रस्त प्रकार घडला होता. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझिम हसन साकिब आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पॉडेल या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादाप्रकरणी आयसीसीने साकिब विरोधात कारवाई केली आहे.
साकिबला आयसीसीकडून दंड बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझिम हसन साकिब आणि रोहित पॉडेल यांच्यातील वादाची आयसीसीनं गंभीर दखल घेतली आहे. आयसीसीनं आचारसंहिता कलम 2.12 च्या उल्लंघन प्रकरणी तंझिम हसन साकिबला दोषी मानत कारवाई केली आहे. आयसीसीनं तंझिम साकिबला मॅच फीच्या 15 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली आहे.
तंझिम साकिबला दंड का झाला? टी 20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधील 37 व्या मॅचमध्ये नेपाळ आणि बांगलादेश आमने-सामने होते. तंझिम साकिब नेपाळविरुद्ध तिसरी ओव्हर टाकत होता. त्यावेळी तंझिम साकिबनं एक आक्रमक बॉल टाकल्यानंतर नेपाळचा कॅप्टन रोहित पॉडेलपर्यंत जाऊन त्याला स्पर्श केला होता. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वादावादी झाली होती. यानंतर पंच सॅम नोगाज्स्की यांनी हस्तक्षेप केला होता.