राजकारणाचा दर्जा घसरला; महिलांसमोर आ. दळवींचे लज्जास्पद वक्तव्य

अश्‍लील भाषेचा वापर करणार्‍या अशिक्षित, अविवेकी आमदारावर कारवाई करा
तालुका चिटणीस अनिल पाटील यांची मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील गेली दोन दशके लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करीत आहेत. रायगड जिल्ह्याच्या विकासात त्यांचे मोलाचे कार्य आहे. अशा ज्येष्ठ आमदाराबाबत अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी महिलांसमोर अश्‍लील भाषेत केलेले आरोप म्हणजे अशिक्षितपणाचे उदाहरण असून, आमदार म्हणून शोभनीय नाही. ज्येष्ठ नेत्याबद्दल आणि महिलांना मान खाली घालायला लावणारे आरोप सहनशक्तीचा अंत करणारे असून, त्यांनी अशी भाषा वापरल्यााबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी केली आहे.


जिल्ह्याच्या अस्मितेला काळीमा फासणार्‍या महेंद्र दळवींनी मिळकतखार येथील कार्यक्रमात शेकाप नेत्यांविरोधात अश्‍लील भाषेचा वापर केला. संपूर्ण जनतेसमोर आणि महिलांसमोर अश्‍लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. जी घराघरात पोहोचली, असे अनिल पाटील यांनी सांगितले. लोकप्रतिनिधीची वागणूक कशी नसावी, याचा नमुना दळवींनी घालून दिला. त्यामुळे त्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ पुरावा मानून महिलांना लाज वाटेल अशा अश्‍लील भाषेचा सार्वजनिक ठिकाणी वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अनिल पाटील यांनी केली आहे.

विकृत लोकप्रतिनिधी
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर डोक्यात हवा भरुन घेणार्‍या आमदार दळवींनी महिलांच्या उपस्थितीत अश्‍लील भाषेचा वापर करणे अतिशय निंदनीय व असंवेदनशील आहे. जिल्ह्याचा तसेच परिसराचा विकास कसा असेल, याबाबत चर्चा करण्याऐवजी विरोधकांवर टीका करण्यातच त्यांनी धन्यता मांडली. या कार्यक्रमात दळवींनी वापरलेल्या अर्वाच्य भाषेमुळे ते मानसिक विकृत असल्याचे समोर येते. भविष्यात त्यांच्या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती दुर्मिळच राहील. कारण, विरोधकांवर टीका करताना आपण कुठे आहोत, याचे भान ठेवणे गरजेचे असते. सामाजिक भान नसणार्‍या या लोकप्रतिनिधीवर कारवाई करा. – प्रवरा खडपे, अलिबाग

लोकशाही मूल्यांचा अनादर
आपली भूमिका मांडताना लोकशाही मूल्यांचा आदर करून भाषा वापरली पाहिजे. वैयक्तिक शिवीगाळ, दमबाजी या गोष्टींना स्थान असू नये, चर्चेचे-संवादाचे नियम सर्वांनी पाळायला हवेत. लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात या सर्व गोष्टींचे पालन करणे अपेक्षित आहे. मात्र, अत्यंत अश्‍लील भाषेचा वापर करुन दळवींनी जिल्ह्याची अस्मिता चव्हाट्यावर आणली आहे. अशा लोकप्रतिनिधींवर कारवाई झालीच पाहिजे. – अरुण म्हात्रे

राजकारणाची पातळी घसरली
राजकारणात आरोप-प्रत्यारोप करणे ही नवी गोष्ट नाही. मात्र, सार्वजनिक कार्यक्रमात स्थानिक आमदार महेंद्र दळवींनी चर्चेची, आरोपाची पातळी घसरून वैयक्तिक टीका-टिप्पणी केली. ही चुकीची गोष्ट आहे. त्या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांच्यासमोर अत्यंत घाणेरडी भाषा वापरली गेली. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. – क्षितीज पाटील

विरोध करताना मर्यादा बाळगा
जी व्हॉइस क्लिप व्हायरल झाली, ती ऐकता सुशिक्षित आणि सुसंस्कारित तरुण राजकारणाकडे वाईट नजरेने पाहतील, अशी भीती निर्माण झाली.विरोधकांचा विरोध करताना एक मर्यादा असावी, याचे भान राज्यकर्त्यांनी बाळगले पाहिजे, अशी टीका अलिबाग तालुका पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी केली.
आज जनतेला जे काम दिसते, त्याला जनता पसंत करते. आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील किंवा शेकपक्षाच्या माध्यमातून होणारे काम हे सर्वांना दिसतेय. अशावेळेला अशा खालच्या पातळीवरील विरोधातून अनेक तरुणांच्या प्रयत्नांची खिल्ली उडवली, याचे वाईट वाटतेय. आज त्यांच्याविषयी रेटून खोटं बोललं तरी जनता खरं-खोटं बघायला येणार नाहीये. पण, म्हणून जनतेला काहीही सांगायचं, हे पटत नाही.कारण, जनता भोळी आहे, ती विश्‍वास ठेवते. पण, आजची तरुण पिढी ही हुशार आहे. तिला खर्‍या-खोट्याची जाण आहे. फक्त भावनिक करून एकदा जनता विश्‍वास ठेवेल, पण जनतेला शेवटी काम दाखवावंच लागतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. शब्दाने बोलण्यापेक्षा कामाने बोलावं, जनताच हिशोब करेल. तरुण वर्गाला संस्कार शिकवायचे सोडून जर चुकीचे राजकारणाचे दर्शन दिले, तर पिढी बरबाद होईल. आज आम्ही तरुणांसाठी गावोगावी विविध प्रशिक्षण, करिअर गाईडन्स आणि सर्वांगीण विकासाचे कार्यक्रम शेकापच्या माध्यमातून करतो. असे असताना जर विरोधक अशी भाषा त्यांना शिकवत असतील, तर पालकांचा रोष ओढवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही विक्रांत वार्डे यांनी दिला आहे.

Exit mobile version