सेटलमेंट करुन पक्ष, चिन्ह घेतलं

शरद पवारांची निवडणूक आयोगासह नार्वेकर, अजित पवारांवर टीका

| पुणे | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हातातून गेल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलेल्या शरद पवार यांनी निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात असा निर्णय येईल याची आम्हाला खात्री होती. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली नाही आणि ते राखतील असे वाटतही नव्हते. असा निर्णय त्यांनी याआधी शिवसेनेबाबतही घेतला होता. त्याच निर्णयाची आमच्याबाबत पुनरावृत्ती झाली. हा निर्णय सेटलमेंट करून घेतल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग किंवा विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली भूमिका अन्यायकारक आहे. पदाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण देशासमोर येण्याचा हा निर्णय आहे. या निर्णयाविरोधात आमच्याकडे वरच्या कोर्टात जाणे हाच पर्याय होता आणि कालच आम्ही सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल केले आहे. निवडणुका तोंडावर असल्याने तत्पूर्वी याबाबत निर्णय घ्यावा अशी आमची न्यायालयाला विनंती असल्याचेही पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पक्ष आणि चिन्ह दुसर्‍याला देणे कधी घडले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, उभारणी कोणी केली हे सगळ्या देशाला माहिती आहे. हे माहिती असतानाही चिन्हासह पक्ष अन्य लोकांच्या हातात देणे हा एकप्रकारे अन्यायकारक निर्णय आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.

चिंता करु नका, संपर्क वाढवा
चिन्ह गेले तरी चिंता करायची नाही. मी आजवर 14 निवडणुका लढलो, त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये वेगवेगळी चिन्ह होती. पहिल्यांदा बैलजोडी, नंतर गाय-वासरु, त्यानंतर चरखा, मग हाताचे चिन्ह आणि त्यानंतर घड्याळ आले. त्यामुळे कुणाला असे वाटत असेल की चिन्ह काढून घेतले म्हणजे त्या संघटनेचे अस्तित्व संपेल, तर असे कधी घडत नसते. फक्त एकच आहे की, सामान्य माणसांशी आपल्याला संपर्क वाढवला पाहिजे. त्यांच्यापर्यंत नवे चिन्ह काय आहे ते पोहोचवले पाहिजे. ते महत्त्वाचे असते.
मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न
निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार उमेदवाराला आहे. पण, संपूर्ण कुटुंब एका बाजूला आणि मी एकटा असल्याचे सांगणे याचा अर्थ लोकांना सतत भावनात्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय, असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला.
Exit mobile version