गीतेंच्या प्रचारासाठी शरद पवार मोर्ब्यात

शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांची माहिती

। माणगाव । प्रतिनिधी ।

रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मोर्बा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येेष्ठ नेते शरद पवार येणार आहेत. मोर्बा येथे मंगळवारी (दि.23) सायंकाळी 4 वाजता एस.एस.हायस्कूल येथील मैदानावर जाहीर प्रचार सभा होणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणिस आ.जयंत पाटील यांनी दिली.

माणगाव तालुक्यातील मोर्बा एस.एस. हायस्कूल येथे शेतकरी कामगार पक्षाच्या व इंडिया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी (दि.17) सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, तळा तालुका शेकाप चिटणीस ज्ञानेश्‍वर भोईर, माणगाव तालुका सहचिटणीस राजेश कासारे, देगाव उपसरपंच दिनेश गुगळे, ज्येष्ठ नेते हसनमिया बंदरकर, मोर्बा माजी उपसरपंच अमोल मोहिते, अँड. कौस्तुभ धामणकर, मधुकर अर्बन, राजू मुंढे, इम्रान बंदरकर, शकील राऊत, आरिफभाई, चंद्रकांत सत्वे, अजीम बंदरकर, राजू मुल्ला, अय्याज मुल्ला आदींसह इंडिया आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले कि, येत्या 7 मे रोजी रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक होत असून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. देशभरात व राज्यात इंडिया आघाडीसाठी उत्स्फूर्त असे वातावरण असून ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांना मुस्लिम समाजबरोबरच इतर सर्व समाजांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंडिया आघाडीत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष व इतर घटक पक्षही या निवडणुकीत जोमाने कामाला लागले आहेत. या निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मोर्बा येथे होणारी सभा ऐतिहासिक होणार आहे.

मोर्बा येथील शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत म्हणाले कि, सुनील तटकरेंनी शेकाप कसा संपेल, उमेदवार कसे पडतील, यासाठी प्रयत्न केले. तटकरेंचा बदला घ्यायचा असल्याने इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागा. तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना सुरुवातीला आ. जयंत पाटील व उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत करून आपल्या इंडिया आघाडीचे सदाचारी उमेदवार अनंत गिते यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

आता बदला घ्यायचा
या निवडणुकीत आपल्याला बदला घ्यायचा आहे. त्यासाठी संपूर्ण ताकदीने इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागा. सुनील तटकरे हे विश्‍वासघातकी आहेत. 2019 मध्ये आपण त्यांना मदत करून दिल्लीत निवडून पाठवले. परंतु याची जाण त्यांनी न ठेवता त्यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला विश्‍वासघात केला. निवडून आल्यावर शेकाप कार्यकर्त्यांनी सुचविलेली विकासकामे केली नाहीत. आता शिवसेना व शेकाप एकत्र असल्याने जिल्हा परिषद आपली आहे. दिवसेंदिवस मोदींची बाजू कमजोर होत चालली आहे. जनतेत महायुतीच्या विरोधात उद्रेक व संताप आहे. मोर्बा येथे होणारी शरद पवारांची सभा रायगडकरांचे पूर्ण लक्ष वेधणार आहे. यासाठी या सभेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
Exit mobile version