| नागोठणे | वार्ताहर |
कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठीतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करीत असलेला नागोठण्यातील ऋषीकेश पाथरकर याला शरद पवार (कृषी) इन्स्पायर फेलोशिप 2023-24 नुकतीच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील एका भव्य कार्यक्रमात खा. शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी खा. सुपदरिया सुळे, अनिल काकोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ऋषीकेश या यशासाठी कोकण कृषी विद्यापीठातील अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.मोहोड यांचे मार्गदर्शन मिळाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात काहीतरी नवे करू इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांना कृषीतील अत्याधुनिक टेक्नॉलॉजी बाबत अवगत करणे आणि तरुणांमधील उद्योजकीय मानसिकता आणि नेतृत्व गुण वाढविणे गरजेचे आहे. हा उद्देश लक्षात घेऊन शरद पवार इंस्पायर फेलोशिप चालू करण्यात आली आहे. त्या स्पर्धेत ऋषीकेशने सुद्धा अर्ज केला होता. अर्ज चाचणी आणि मुलाखत या प्रक्रियेनंतर सुमारे 2000 विद्यार्थ्यांमधून 80 विद्यार्थी निवडले गेले. त्यात रायगड जिल्ह्यातुन ऋषिकेश याची निवड झाली होती. काजूच्या पानांवर प्रक्रिया करून त्यापासून जैविक इंधन तयार करणे हा ऋषिकेशचे संशोधन विषय होता. याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे न्यू सूर्यदर्शन हाऊसिंग सोसायटी मधील सर्व पदाधिकारी, सभासद व शांतीनगरमधील रहिवासी तसेच विनोद घोसाळकर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
ऋषिकेशला शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
