पवारांसह सुनिल गावसकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
| मुंबई | प्रतिनिधी |
कितीही नाव कमावले आणि अनुभव पाठीशी असला तरी क्रिकेटमध्ये प्रत्येक जण कायमच विद्यार्थी असतो, कोणीही मास्टर नसतो, असे अनुभवाचे बोल भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे. शनिवारी (दि.23) मुंबई क्रिकेट संघटनेच्या संग्रहालयाचे उद्घाटन पार पडले. या संग्राहलायाला ज्येष्ठ राजकारणी तथा मुंबई, भारतीय क्रिकेट आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर शरद पवार आणि सुनील गावसकर यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय क्रिकेटची पंढरी समजली जाणारे मुंबई क्रिकेट आणि वानखेडे स्टेडियमच्या वास्तूमध्ये अनेक विक्रम आणि इतिहास घडलेले असले तरी मुंबई क्रिकेटचा गौरव नव्या पिढीसमोर दाखवण्यासाठी संग्रहालय नव्हते. आता वानखेडे स्टेडियमच्या वास्तूतच डिजिटल स्वरूपाचे कोंदण असलेले अद्ययावत संग्रहालय उभे राहिले आहे. मुंबई, भारतीय क्रिकेट आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव या संग्रहालयाला देण्यात आले आहे. तसेच, याच मैदानावर सुरुवात करून सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. काही वर्षांपूर्वी याच मैदानावर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता. आता या वास्तूच्या द्वारावर स्वतः शरद पवार यांच्यासह सुनील गावसकर यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले आहे. दरम्यान, स्टेडियममध्ये आपलाच पुतळा पाहून सुनील गावसकर भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
अनेक विक्रमांचे बादशहा अशी गावसकर यांची ओळख होती. त्यांनी शालेय क्रिकेटपासून आपला ठसा उमटवलेला होता. तरी देखील त्यांना मुंबई रणजी संघात स्थान मिळवण्यासाठी अडीच वर्षे वाट पाहावी लागली होती. त्याची आठवण सांगताना गावसकर म्हणाले की, तो दुलीप करंडकाचा सामना होता. त्यातील 22 पैकी 21 खेळाडू हे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळत होते. तर, मी मुंबई रणजी संघात संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत होतो. त्यानंतर अडीच वर्षे मला रणजी संघात स्थान मिळाले नव्हते. मला पुढच्या सामन्यात संधी मिळेल, असे सांगण्यात येत होते. अखेर कर्णधार अजित वाडेकर यांनी मला अंतिम सामन्यात खेळवले, ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे असायचे. हे संग्रहालय केवळ मुंबई क्रिकेटपुरते मर्यादित नसावे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचेही प्रतिनिधित्व असावे, अशी सूचना गावसकर यांनी केली. कारण परदेशातील त्यांच्या संग्रहालयात आपल्या भारतीय क्रिकेटचाही उल्लेख असतो आणि स्थान दिलेले असते, असे गावसकर म्हणाले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, 1962 पर्यंत मी मुंबई पाहिली नव्हती, कॉलेजमधून मुंबईत आलो तेव्हा सर्वप्रथम मी येथील क्रिकेटची मैदाने पाहण्यास प्राधान्य दिले होते. मैदाने हीच तुमच्या खेळातील प्रगतीची मापक असतात, असे ते म्हणाले. पुढे बोलताना पवार म्हणाले की, मुंबई क्रिकेटसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. मुळात मुंबई आणि क्रिकेट यांचे फार वेगळे नाते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे नाते आहे. हजारो खेळाडू वेगवेगळ्या स्तरावर येथे क्रिकेट खेळत असतात. ज्यांनी मुंबईचे क्रिकेट घडवले, जगातही नाव मिळवून दिले, अशा मुंबई क्रिकेटचा इतिहास नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे आणि त्यासाठी संग्रहालयाची अत्यंत्य गरज होती; परंतु, मुंबई म्हटले की जागेचा प्रश्न येणारच. अद्यावत आणि परिपूर्ण संग्रहालय कोठे उभे करायचे, हा प्रश्न होता. अखेर सध्याच्या प्रशासनाने मार्ग काढला आणि जागा तयार करून वानखेडेवरच हे संग्रहालय तयार केले हे फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे या सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद देतो, असे पवार यांनी सांगितले. मुंबई पर्यटनामध्ये या संग्रहालयाचा समावेश करा असेही शरद पवार म्हणाले. यावेळी सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते.
सुनिल गावसकर भावुक
याप्रसंगी गावसकर यांनी काहीसे भावनिक होऊन स्वतःच्या शालेय क्रिकेटपासून सुरू झालेला प्रवास उलगडला. स्वतःचा पुतळा पाहून ते म्हणाले, पुतळ्यासाठी माझा चेहरा असला तरी तो अगदी मुंबईतील टेनिस क्रिकेट, शालेय, कॉलेज, क्लब आणि रणजी क्रिकेटपटूंचे एकत्रित प्रतीक आहे. हा माझ्या एकट्याचा गौरव नसून सर्वांचा आहे. मुंबई क्रिकेट ही माझी आई आहे आणि या आईने हात धरून मला पुढे आणले. आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती. माझे मामा आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू माधव मंत्री यांच्याकडून शिस्त शिकलो, त्याचा फायदा मला पुढे झाला. म्हणूनच कितीही मोठे खेळाडू झालात तरी शिकण्याची वृत्ती सोडू नका. प्रत्येक दिवस नवे काही तरी शिकवणारा असतो, त्यामुळेच कोणीही मास्टर होत नाही. तो कायमच विद्यार्थी असतो, असा उल्लेख गावसकर यांनी आवर्जून केला.









