फोडाफोडीच्या राजकारणाला थारा नाही -शरद पवार

कराडच्या प्रीतीसंगमावर बंडखोरांना इशारा
| कराड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र आणि देशात जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा फोडफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. महाराष्ट्रात उलथापलथ करण्याची भूमिका काही प्रवृत्तींनी घेतली, पण या फोडाफोडीचा त्यांना काही फायदा होणार नाही. अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रातील सामान्य जनता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर शरद पवार आज कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली. त्यांचे राज्यातील कार्यकर्त्यानी कराड येथे येऊन जल्लोषात स्वागत केले.यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा.श्रीनिवास पाटील, आ.बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, मकरंद पाटील, रोहित पवार आदी उपस्थित होते.

मी द्वेषाचं राजकारण करत नाही
अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आल्याबाबत विचारणा केली असता तो अधिकार जयंत पाटलांचा असल्याचं नमूद केलं आहे. मी कुणाच्याही बद्दल नाराजी व्यक्त करत नाही. काही सहकाऱ्यांनी जे केलं ते योग्य नाही. पण त्यासाठी मी मनात द्वेष ठेवून राजकारण करत नाही. त्यांनी जर भेटायची वेळ मागितली, तर विचार करू, असं म्हणत अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांसाठी परतीची संधी खुली असल्याचे संकेतच शरद पवारांनी यावेळी दिले.

पहिली सभा जुन्नरमध्ये
शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांची पहिली सभा जुन्नरमध्ये होणार आहे. ही पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडेंच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे.

अजित म्हणजे पक्ष नव्हे
अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे. अजित पवार हे परके नाहीत. पण मतभिन्नता असू शकते. माझा आशीर्वाद घेऊन निर्णय घेतल्याचं सांगत संभ्रम निर्माण केला गेला. तसंच अजित पवार हे ईडीच्या कारवाईच्या दबावातून गेलेले नाहीत. अशी माहिती माझ्याकडे नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

पटेल, तटकरेही कचाट्यात
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. घटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका दाखल करावी, असं पत्र राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना पाठवलं आहे.

वेगळं काहीतरी घडतंय असं सांगण्याचं कारण नाही. यांना हे आज कळलं. अडीच वर्षांपूर्वी आम्ही सरकार स्थापन केलं, त्यावेळी काल ज्यांनी शपथ घेतली त्यांनीही शपथ घेतली होती. त्यावेळी शिवसेनेची चिंता कुणाला वाटली नाही. त्यामुळे आज ते जे म्हणतायत त्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही.

शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष
Exit mobile version