शरद पवार माढ्यात टाकणार डाव

| मुंबई | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणुकीत बारामती पाठोपाठ सर्वाधिक चर्चा माढ्याची सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या माढ्यात सध्याच्या घडीला भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत. भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्‍वास दाखवला आहे. निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्याने माढ्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. माढा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी पवारांनी दाखवली होती. याबद्दल जानकर यांची पवारांसोबत चर्चाही झाली. पण जानकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. त्यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेत परभणीची जागा पदरात पाडून घेतली.

नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने मोहिते पाटील कुटंब नाराज आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी विरोध आहे. पण मोहिते पाटील कुटुंब भाजप सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे शरद पवार सध्या माढ्यासाठी उमेदवाराच्या शोधात आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दोनदा शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची एक बैठक दिल्लीत झाली.

शरद पवार आणि प्रवीण गायकवाड यांच्यात माढा लोकसभेतून उमेदवारीबद्दल चर्चा झाली. मोहिते पाटील माढा लढवणार नसतील, तर मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी पवारांना सांगितलं. त्यामुळे शरद पवार माढ्यात काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version