काका, साहेब आम्हाला माफ करा!

अजित पवार गटाकडून पवारांची मनधरणी

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रवादीपासून फारकत घेत स्वतंत्र गटाद्वारे सरकारात सहभागी झालेल्या उपमुखमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नऊ मंत्र्यांची रविवारी (दि.16) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत सर्वांनी त्यांची मनधरणी करत माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण यावर त्यानी मौन बाळगल्याचे बोलले जाते.

राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (दि.17) सुरू होत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खासकरून राष्ट्रवादीतील आमदार या पावसाळी अधिवेशनात किती आक्रमक होतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी पवारांची भेट का घेतली याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले पटेल
आज आमचे सर्वांचे दैवत, शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित दादा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनजंय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसह मंत्री महोदय यशवंतराव चव्हाण सेंटरला आलो होतो. पवारांचे पाया पडून आम्ही आशीर्वाद मागितले. आम्ही सर्वांनी साहेबांना विनंतीही केली की आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहू शकतो, त्यासाठीही योग्य विचार करावा. आणि येणाऱ्या दिवसांत मार्गदर्शन करावं, अशी आम्ही विनंती केली आहे. पवारांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचं जे मत होतं, विनंती होती ते ऐकून घेतलं. आणि भेटीनंतर आता इथून जात आहोत. सोमवारी विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, सर्व मंत्री अजित दादांच्या नेतृत्त्वामध्ये आपपल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची मला कल्पना नाही. मात्र, वर्षानुवर्षे शरद पवार त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे भेट घेतली तर त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. यातून काही राजकीय समीकरणं तयार होतील का, याची मला कल्पना नाही.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पवारांची खलबतं
या भेटीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची एक बैठक वाय बी सेंटरमध्ये झाली. त्या बैठकीनंतर बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं विधान करुन ते माघारी परतले तर आनंदच होईल, असं म्हटलं आहे.

आमची प्राथमिकता अशी आहे की, सगळे माघारी आले तर मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून आनंदच वाटेल. आम्ही सरकारमध्ये नाहीत. आमचे काही लोक तिकडे गेले आहेत, त्यांनी सरकारला समर्थन दिलेलं आहे. मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. शिवसेना आणि काँग्रेससोबत सध्या आम्ही पुढे जात आहोत.

जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष

दरम्यान, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार देवगिरिवर दाखल झाले. त्यांच्यासह अन्य सर्व मंत्री देवगिरिवर दाखल झालेले असून त्यांची बैठक झाली. एकीकडे वाय बी सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठक झाली. या सगळ्या प्रकारात शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

Exit mobile version