। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ 16 नोव्हेंबर रोजी म्हसळा येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती म्हसळा तालुका अध्यक्ष अजहर धनसे यांनी दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने आता प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. महाविकास आघाडी तर्फे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जागा मिळाली असून महाविकास आघाडीतर्फे अनिल नवगणे यांना उमेदवारी मिळाली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात महायुती तर्फे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार आदिती तटकरे या निवडणूक लढवीत आहेत. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे.
शरद पवार यांच्या सभेच्या माध्यमातून श्रीवर्धन मतदारसंघात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात प्रचाराचा झंझावत पाहायला मिळणार आहे. यामुळे शरद पवार व भास्कर जाधव सभेला नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेदरम्यान श्रीवर्धन तालुक्यातील महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचीदेखील माहिती मिळत आहे.