पवारांचा राजीनामा आणि रायगड

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याचे पडसाद राज्यातील विविध जिल्ह्यात पवार समर्थकांनी राजीनामे देत उमटत आहेत. तसे रायगडमध्ये उमटू शकतात का, याचे नाही असेच उत्तर मिळेल. कारण पवारांचे कट्टर समर्थक म्हणून घेणारे नेतृत्व रायगडात निर्माणच झाले नाही. किंबहूना ते निर्माण होऊच दिले गेले नाही. याला सर्वस्वी जबाबदार आहेत ते खा. सुनील तटकरे. कारण तटकरे हे अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात आणि दादांचा कल सध्या कुठे आहे हे सार्‍या राज्यातील जनतेला माहित आहे.

रायगडमध्ये पवार यानां मानणारे सर्वच पक्षात आहेत. विविध घटकांच्या माध्यमातून पवार यांनी अनेक नेते, परिवाराशी स्नेहाचे संबंध जोडले. ते आजही अखंडित आहेत. पण त्या संबंधांचा आणि पवार यांच्या राजकारणाचा काहीही संबंध नाही. रायगडमध्ये पवार परिवाराचे खंदे समर्थक म्हणून खा. सुनील तटकरे ओळखले जातात. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या समवेत तटकरे यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे बोलतील तीच राष्ट्रवादीची पूर्व दिशा हे समीकरण दृढ झालेले आहे. तटकरे यांनीही पक्षात दुसरे  नेतृत्वच निर्माण होऊ दिले नाही. राष्ट्रवादीची सूत्रे तसेच रायगडची सर्व सत्ताकेंद्रे आपल्याच परिवाराच्या हातात कशी राहतील हे सूत्र त्यांनी कटाक्षाने पाहिले. जे पवार यांच्याशी जवळीक वाढवतील त्यांचा राजकीय काटा काढून आपलचे प्राबल्य कसे राहू शकते याकडेच तटकरे यांनी लक्ष केंद्रीत करणे उचित समजले. त्याचा परिणाम असा झाला की, आज रायगडमध्ये तटकरे हे बोलतील तेच राष्ट्रवादीत घडत असते.

1999 मध्ये काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या या निर्णयाचे कोकणामध्ये पहिले स्वागत केले ते अलिबागचे दत्ता खानविलकरांनी. त्यांनी त्यावेळी जिल्ह्यात दौरे करून शरद पवार यांना मानणार्‍या नेत्यांना एकत्र केले. त्यावेळी त्यात महाडचे माणिकराव जगताप, पालीचे वसंतराव ओसवाल, पेणचे आप्पासाहेब धारकर आदींचा समावेश होता. सुनील तटकरे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद जसजशी  वाढू लागली त्यावेळी तटकरे यांची अस्वस्थता वाढू लागली. त्यावेळी कोलाड येथे रायगड जिल्हा काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात तटकरे यांनी आपल्या दिवंगत वडिलांची शप्पथ घेत मी अंतुले यांची साथ सोडणार नाही, राष्ट्रवादीत जाणार नाही असे जाहीर केले होते. या मेळाव्यानंतर अवघ्या आठ दिवसातच सुनील तटकरे, अशोक साबळे यांनी मुंबईमध्ये  राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची सूत्रे हाती घेत पक्षातील आपले स्थान इतके बळकट केले की ज्यांनी राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रायगडमध्ये रोवली ती मंडळी पक्षातून कधी बाहेर फेकली गेली याचा थांगपत्ता त्यांनाही लागला नाही.

तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून वसंत ओसवाल यांच्याकडे जिल्हा अध्यक्षपद देऊन भाऊ खानविलकर यांचे पंख छाटले गेले. (त्याच ओसवाल यांच्या कन्या गीता पालरेचा यांनीही अलिकडेच भाजपत प्रवेश केला आहे.) माणिकराव जगताप यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करून तटकरे यांनी आपला राजकीय मार्ग निर्वेध केला. त्यानंतर सलग तीन टर्म राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्रीपदे भूषविली. या काळात अजितदादा यांच्याशी जुळलेले संबंध तटकरे याना पक्षात स्थान बळकट करायला उपयुक्त ठरत गेले. त्यामुळे पवार कुटुंबीयांनी पण रायगड म्हंटले की सुनील तटकरे हेच नजरेसमोर धरत दुसरे तोलामोलाचे नेतृत्वच उभे करण्याकडे दुर्लक्ष केले. आज तटकरे कुटुंबामध्ये खासदार, दोन आमदार अशी राजकीय पदे आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार असलेल्या अदिती तटकरे या अडीच वर्ष पालकमंत्री म्हणून काम करीत होत्या. त्यापूर्वी त्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचा कारभार बघत होत्या. याचाच अर्थ रायगडमध्ये सुनील तटकरे बोलतील तेच राष्ट्रवादीत होणार आणि शरद पवार त्याला मान्यता देणार असेच समीकरण घडतं आले.

कर्जतमधील राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांचे राजकीय खच्चीकरण कुणी केले हे सार्‍या रायगडला ज्ञात आहे. आपल्यापेक्षा वरचढ होईल असे नेतृत्व जिल्ह्यात निर्माण होऊच द्यायचे नाही, मी बोलेल तीच रायगडची पूर्व दिशा असेच पवार यांच्या मनावर बिंबविण्यात सुनील तटकरे निश्‍चित यशस्वी झाले हे कुणीही नाकारू शकत नाही. याचा परिणाम असा झाला की पवार यांनी राजीनामा देऊनही त्याचे साधे पडसाद पण रायगडमध्ये न उमटणे हे त्याचेच द्योतक म्हटले पाहिजे. उद्या राष्ट्रवादीत काही मोठे बदल झाल्यास त्यात मनाचे स्थान फक्त आणि फक्त सुनील तटकरे यानाच मिळत राहील. नाहीतरी अजित पवार यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून सुनील तटकरे यांनाच ओळखले जाते. गेल्या महिन्यात अजित पवार भाजप मध्ये जाणार अशी जी अफवा पसरली होती. त्यावेळी शाह यांना भेटण्यासाठी गेलेल्यांमध्ये सुनील तटकरे यांचाही समावेश होता, असे बोलले जाते. याचाच अर्थ तटकरे यांनी अजित पवारांच्या मनात आपले स्थान इतके मजबूत करून ठेवले आहे की रायगडमध्ये तटकरे हीच राष्ट्रवादीची ताकद असेच मानले जाईल.

– अतुल गुळवणी
9270925201

Exit mobile version