। अलिबाग । वार्ताहर ।
हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात सोमवारी (दि.7) जिल्हास्तरीय शारदीय वाकगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या उपाध्यक्ष व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरोज डाकी यांनी शारदा मातेचे पूजन करून केले. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील 11 शाळांमधील 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम गटासाठी ‘अशी झाली फजिती’, द्वितीय गटासाठी ‘आली आली निवडणूक आली’ तर तृतीय गटासाठी ‘आजची स्त्री सुरक्षित आहे का?’ असे तीन विषय होते. या स्पर्धेत 24 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तर, गीत गायन या स्पर्धेसाठी बालगीत, भावगीत, लावणी आणि गीत रामायणातील एक गीत हे विषय होते. या स्पर्धेसाठी 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. मुख्याध्यापक गायकवाड, व पर्यवेक्षक प्रबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलातील सर्व शिक्षक वृंदांनी शारदीय वाकगीत गायन स्पर्धा यशस्वी पार पाडली. स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभाग घेतलेल्या सर्व 50 स्पर्धकांनादेखील आकर्षक प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून प्रांजली पाटील, अर्चना ठाकूर, अतिश मोकल, सुचिता म्हात्रे, कोळी, गुजर यांनी काम पाहिले.
यावेळी शारदीय वाकगीत गायन स्पर्धेसाठी हाशिवरे हितवर्धक मंडळ या संस्थेच्या सदस्या मालती मोकल, सदस्य निशिकांत मोकल, सल्लागार सुबोध मोकल उपस्थित होते. तसेच, पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सांगळे व सहकारी, संस्थेचे हितचिंतक, पालक व व्यवस्थापक शिक्षक यांनी उपस्थिती नोंदवली.







