ती विणतेय गजर्‍यात आयुष्य


। पेण । संतोष पाटील
नवरात्र म्हटलं की, नवदुर्गेचा जागर आणि स्त्रीशक्तींचा जागर. मेणाहून मऊ मउ आणि वज्राहून कठीण हे दोन्ही गुणधर्म फक्त आणि फक्त नारी जातीतच आहे. म्हणून तर म्हटलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उध्दार करी. गजरेे विणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या एका महिलेची ही कहाणी.
आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकजण विविध व्यवसाय करतात. त्याप्रमाणे पेण येथे गेली 30 वर्षे वास्तव्यास असलेली मेघा वाघमारे आणि तिचे सहकारी दुसर्‍यांच्या सौंदर्यात भर घालणारे वेगवेगळ्या फुलांचे गजरे विणून त्यातून आपली कशीबशी चटणी-भाकरी मिळवत आहेत. दिवसेंदिवस कमाई कमी होत चालल्याने त्यांच्यासमोर पोटाचा यक्ष प्रश्‍न निर्माण होत आहे. दिवसभर रस्त्यावर उभे राहून गजरे विकणार्‍या मंडळींना उन्हाचा ताप जाणवत असतानाही आपल्या उदरनिर्वाहासाठी रणरणत्या उन्हात उभे राहून गजर्‍यांची विक्री करावी लागते.

व्यापारी पेठ म्हणून पेणचा नावलौकिक आहे. या ठिकाणी सर्व स्तरांतील व्यवसायदारांनी आपले बस्तान बसवलेे आहे. त्याचबरोबर काही कुटुंबियांनी आपल्या मुळ गावी उदरनिर्वाहाचे काही साधन नसल्याने फिरत-फिरत पेण गाठले. पेणच्या आजूबाजूच्या परिसरात झोपड्या करून ते राहू लागले. त्यानंतर त्यांनी फुलांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कालांतराने ही कुटुंबे गजरेही विणू लागली. मोगरा, सायली, तगर, चमेली, चाफा आदी प्रकारांची फुले आणून त्याचे गजरे गुंफून त्याची विक्री करणे ही त्यांची दैनंदिनी आहे. या कामात त्यांचा हातखंडा झाला असून एक व्यक्ती दिवसाला किमान 40-50 गजरे विणत असल्याचे ते सांगतात. लग्नसराई, गणपती, दिवाळी यासारख्या सणांना गजर्‍यांना चांगली मागणी असल्याने या काळात दिवसाला खर्च काढून 300 ते 400 रुपये मिळत असल्याचे मेघा वाघमारे हे सांगतात.
पावसाळ्यात धंदा कमी असतो. दिवसेंदिवस फुलांचे भाव वाढत चालले असून त्या तुलनेत ग्राहक जास्त दराने गजरे विकत घेत नाहीत, परिणामी नफ्यातही वाढ होत नसून कधी साधी रोजंदारीही सुटत नसल्याची खंत मेघा वाघमारे यांनी व्यक्त केली.

गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या गजरे विणणार्‍या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. परंतु या संकटाला देखील या मंडळीने धीराने तोंड देत आपला संसाराचा गाडा हाकला. आता नवरात्रीचे दिवस असल्याने साधारणता गजर्‍याला 15 ते 20 रूपये एका नगामागे मिळतात. परंतु सीझन नसेल तर 5 ते 10 रूपयाला गजरा विकावा लागतो हे ही त्यातले कटू सत्य आहे. असं असताना देखील गेली 30 वर्ष मेघा वाघमारे हिच्या सह इतर तिच्या मैत्रीनी देखील हा गजर्‍यांचा व्यवसाय करून दुसर्‍यांच्या सौदर्यास भर टाकतात.
हया व्यवसायातूनच आपल्या कुटुंबाला योग्य दिशा देण्याचे काम मेघा सारखे 10 ते 12 कुटुंब करत आहेत.परंतु मेघा ही लहाणपणा पासूनच हा व्यवसाय करत आहे. या व्यवसायाच्या जोरावर आज ती मानाने आपल जीवन व्यथित करत आहे.

Exit mobile version